स्वातंत्र्य दिनी भिडेंची भगवा रॅली ; वडेट्टीवार म्हणाले, "गुरुजीच्या विद्यार्थ्यांची..."

स्वातंत्र्य दिनी सांगलीत संभाजी भिडेंनी भगवा रॅली काढल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
स्वातंत्र्य दिनी भिडेंची भगवा रॅली ; वडेट्टीवार म्हणाले, "गुरुजीच्या विद्यार्थ्यांची..."
Published on

संभाजी भिडे आणि वाद हे आता जणू समिकरणच झालं आहे. आज अवघा देश आपला ७७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. असं असताना तिकडे सांगलीत मात्र, शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मात्र भगवा रॅली काढली आहे. यांच्या रॅलीमुळे काँग्रेसमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे. राज्याचे विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भिडेंच्या या कृत्याचा अत्यंत कडवट भाषेत समाचार घेतला आहे.

गेल्या महिन्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने भिडेंविरोधात काँग्रेससह अनेक पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त केला गेला होता. राज्याच्या विधिमंडळापासून ते गल्लीपर्यंत आक्रमक होत काँग्रेसने निषेध नोंदवला होता. यावेळी भिडेंना अटक करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी संभाजी भिडे यांना पोलिसांनी नोटीस देखील पाठवलेली आहे.

हे प्रकरण ताज असताना आता आज स्वातंत्र्य दिनी सांगलीत संभाजी भिडेंनी भगवा रॅली काढली. यावर विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप नोंदवला आहे. तिरंग्याला विरोध म्हणून हा मनोहर कुलकर्णी नावाचा माणूस भगवी रॅली काढत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. आता ज्यांनी त्यांना गुरुजी म्हणून संबोधलं त्या विद्यार्थ्यांची भूमिका काय, हे महाराष्ट्र बघणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, एकीकडे देशाचा पंतप्रधान तिरंग्याला सलाम करतात आणि त्यांचे भक्त तिरंग्याला विरोध करण्यासाठी भगवी रॅली काढतात. यावरुन त्यांचा रंग कोणता हे दिसून येत आहे. भिडेंनी राष्ट्रद्रोह केला असून भिडे खऱ्या अर्थाने राष्ट्रविघातक आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, भिडेंवर त्वरित कारवाई झाली पाहीजे, नाहीतर हा देश सरकारला माफ करणार नाही. ज्यांनी भिडेंना गुरुजी म्हटलं त्या विद्यार्थ्यांची यावर भूमिका काय असेल? हे देश बघतोय, निदान आम्ही त्यांच्या सोबत नाही हे सिद्द होईल म्हणून तरी कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in