भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपीची हायकोर्टात धाव; आजारी वडिलांना भेटण्यासाठी अंतरिम जामीन देण्याची विनंती

महाराष्ट्रासह देशभर गाजलेल्या भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी रमेश गायचोर याने जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वडिलांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन द्यावा, अशी विनंती गायचोरने जामीन अर्जातून केली आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपीची हायकोर्टात धाव; आजारी वडिलांना भेटण्यासाठी अंतरिम जामीन देण्याची विनंती
Published on

मुंबई : महाराष्ट्रासह देशभर गाजलेल्या भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी रमेश गायचोर याने जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वडिलांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन द्यावा, अशी विनंती गायचोरने जामीन अर्जातून केली आहे. याची दखल घेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) उत्तर देण्यास दोन आठवड्याची मुदत देत सुनावणी तहकूब ठेवली.

भीमा कोरेगाव एल्गार परिषद आयोजित करण्यामध्ये सहभाग घेतल्याच्या आरोपावरून एनआयएने रमेश गायचोर याला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून वडिलांच्या प्रकृतीचे कारण देत त्याने तुरुंगातून तात्पुरत्या कालावधीसाठी सुटका करण्याबाबत निर्देश देण्याची विनंती केली आहे. गायचोरला विशेष न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर करण्यास १ जुलैला नकार दिला होता. त्या आदेशाला आव्हान देत गायचोरने उच्च न्यायालयाचा जामीनासाठी दाद मागितली आहे.

त्याच्या अर्जावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे प्राथमिक सुनावणी झाली. गायचोरचे ७५ वर्षीय वडील आजारी आहेत. त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचा विचार करून न्यायालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी विनंती गायचोरच्या वकिलांनी न्यायालयाला केली.

logo
marathi.freepressjournal.in