भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; पाच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपींना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; पाच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
Published on

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेल्या सुधीर ढवळे, महेश राऊत, रोना विल्सन, शोमा सेन आणि सुरेंद्र गडलिंग या पाच आरोपींना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या खंडपीठाने या आरोपींचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळून लावला.

भीमा-कोरेगाव येथील ३१ डिसेंबर २०१७ आणि १ जानेवारी २०१८ दरम्यान झालेल्या हिंसाचाराला जबाबदार ठरवून पुणे पोलिसांनी विविध गुन्ह्यांतर्गत १६२ जणांविरोधात ५८ गुन्हे दाखल करून सुरेंद्र गडलिंग यांच्यासह सुधीर ढवळे, रोना विल्सन आणि अन्य आठ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले.

ज्या न्यायालयात रिमांडसाठी हजर केले, ते न्यायालय विशेष न्यायालय म्हणून सक्षम नव्हते. त्यामुळे आमची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत या आरोपींनी डिफॉल्ट जामीन मिळावा म्हणून सत्र न्यायालयात अर्ज केला. मात्र, सत्र न्यायालयाने आरोपींचा डिफॉल्ट जामिनाचा अर्ज फेटाळून लावला. त्या आदेशाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यानंतर खंडपीठाने राखून ठेवलेला निर्णय शुक्रवारी जाहीर करताना आरोपींना दिलासा न देता डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळून लावले.

logo
marathi.freepressjournal.in