
भिवंडी : एका ३२ वर्षीय विवाहितेने पोटच्या तीन मुलींसह राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भिवंडी शहरातील फेणे गावातील एक मजली चाळीच्या खोलीत घडली आहे.
आमच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिलेली सुसाइड नोट घटनास्थळी पोलिसांना आढळली आहे. पुनिता लालजी भारती (३२), त्यांच्या मुली नंदिनी (१२), नेहा ( ७) आणि अनु (४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालजी बनवारीलाला भारती हा पत्नी आणि तीन मुलींसह फेणे गाव येथील एका चाळीतील पहिल्या मजल्याच्या खोलीत राहत होता. लालजी भारती हा यंत्रमाग कामगार असून तो शुक्रवारी रात्रपाळीवर लूम कारखान्यात कामावर गेला होता, तर पत्नी पुनिता, मुली नंदिनी, नेहा व अनु या घरीच होत्या. त्यातच लालजी रात्रपाळी करून सकाळी नऊच्या सुमारास घरी परतला असता घरचा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा दरवाजा ठोठावूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने लालजीने घराच्या छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केलेले चारही मृतदेह आढळून आले.
या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळी एक सुसाइड नोट आढळून आली असून त्यामध्ये आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिलेले आढळले. या विवाहितेने मुलींसह आत्महत्या का केली व त्यास अन्य कोणते कारण आहे का, हे अजून स्पष्ट झाले नसले तरी पोलीस या आत्महत्येचा तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.