सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय दिला आहे. राज्यपालांच्या आदेशाला आक्षेप घेत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर साडेतीन तास चर्चा झाली. शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी तर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना, राज्यपालांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्याने ते वैध नसल्याचे सांगत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फ्लोअर टेस्ट घेण्याच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. आम्ही फ्लोअर टेस्ट थांबवणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, सध्या आम्ही महाराष्ट्रात फ्लोर टेस्ट थांबवू शकत नाही. त्यामुळे उद्या निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार ११ वाजता फ्लोअर टेस्ट घेण्यात येणार आहे.