राज्यात देवस्थान जमिनी हडपण्याचे मोठे रॅकेट कार्यरत; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचा आरोप

देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचे मोठे रॅकेट राज्यभर कार्यरत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
राज्यात देवस्थान जमिनी हडपण्याचे मोठे रॅकेट कार्यरत; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचा आरोप
राज्यात देवस्थान जमिनी हडपण्याचे मोठे रॅकेट कार्यरत; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचा आरोपसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचे मोठे रॅकेट राज्यभर कार्यरत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केला. विशेष करून बीड आणि सांगली जिल्ह्यातील हिंदू देवस्थान जमिनीचे विविध प्रकरणे मी सभागृहाच्या निदर्शनास आणली आहेत. त्यावर तत्कालीन महसूल मंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले. पण त्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

विधानसभेत नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील चोरीचा तसेच महाकाल नगरीत तिथल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या जमीन घोटाळ्याचा उल्लेख विधानसभेत झाला.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या ४,१२१ एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीत घोटाळा झाला असल्याचा दावा पाटील यांनी केला.

तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानी देवीला सुमारे ४,१२१.१४ एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. महसूल अधिकारी आणि काही नेत्यांनी संगनमताने हजारो एकर देवीची जमीन लाटली, असा आरोप पाटील यांनी केला.

बीड जिल्ह्यातील चिंचेपूर (ता. आष्टी) येथील मशीद आणि दर्गाह इनाम जमीन सन २०१८ मध्ये एका बनावट खालसा आदेशान्वये बेकायदेशीरपणे लाटण्यात आली. जी जमीन ‘खिदमतमास’साठी (सेवा) असायला हवी होती. ती केवळ कागदोपत्री ‘मदतमास’ दाखवून तिची बेकायदेशीर हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

विभागीय आयुक्तांकडे कार्यवाही प्रलंबित

राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या चौकशीतही मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून तब्बल ९५ बनावट खालसा आदेशांचे प्रकरण तपासात निष्पन्न झाले आहे. देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचे इतके मोठे संघटित रॅकेट सुरू असताना या प्रकरणाची पुनर्निरीक्षण कार्यवाही अद्यापही छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असल्याकडे पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in