बनावट औषधे खरेदी-विक्रीत मोठे रॅकेट; योग्य तो तपास सुरू - धर्मरावबाबा अत्राम

बनावट औषधे खरेदी-विक्री करण्यात एक मोठे रॅकेट गुंतले सक्रिय असून, त्याचा बीमोड करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तेलंगणा ते गुजरात आणि तेथून महाराष्ट्र असे मोठे रॅकेट सक्रिय आहे.‌
बनावट औषधे खरेदी-विक्रीत मोठे रॅकेट; योग्य तो तपास सुरू - धर्मरावबाबा अत्राम
Published on

मुंबई : बनावट औषधे खरेदी-विक्री करण्यात एक मोठे रॅकेट गुंतले सक्रिय असून, त्याचा बीमोड करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तेलंगणा ते गुजरात आणि तेथून महाराष्ट्र असे मोठे रॅकेट सक्रिय आहे.‌ रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी योग्य तो तपास सुरू असल्याचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी विधान परिषदेत सांगितले.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ मध्ये सुमारे २.८५ कोटी रुपयांची बनावट औषधे जप्त केल्याचे प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना अत्राम यांनी सांगितले.

तेलंगणा येथील मे. हेट्रो हेल्थकेअर या उत्पादकाचे बनावट इंजेक्शनच्या साठ्याची विक्री बाजारात होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे त्या बनावट साठ्याचा शोध घेतला. त्यावेळी चेंबूरच्या लाइफ क्युरा फार्मा यांच्याकडे सदर औषधांच्या तीन व्हाईल्स सापडल्या. त्यापैकी दोन व्हाइल्स औषध नियंत्रण प्रयोगशाळेकडे चाचणीसाठी पाठविण्यात आल्या. एका व्हाईल्सची तुलना उत्पादनाच्या वेळी ठेवण्यात आलेल्या कंट्रोल सॅम्पलसोबत केली असता, लाइफ क्युरा फार्मा यांच्याकडील औषध बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बनावट औषधे खरेदी-विक्री करणाऱ्या के. डेक्कन हेल्थकेअर या दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच इतर औषध विक्रेत्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे धर्मरावबाबा अत्राम यांनी सांगितले.

या प्रकरणात तलेगणापासून गुजरातमार्गे महाराष्ट्रापर्यंत मोठे रॅकेट गुंतले असून, त्याचा तपास करण्यात आणि बीमोड करण्यास थोडी अवधी लागेल, पण कारवाई निश्चित करणार, असे आश्वासन धर्मरावबाबा अत्राम यांनी दिले.

वेळोवेळी औषधांची तपासणी

बनावट औषधप्रकरणी तालुका आणि जिल्हास्तरावर असलेल्या इन्स्पेक्टरकडून यांच्याकडून वेळोवेळी औषधांची तपासणी करण्यात येते. त्यांच्याकडून याबाबत वेळोवेळी माहिती घेतली जाते. बनावट इंजेक्शन आढळलेल्या त्या कंपनीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा लावण्याबाबत इतर सर्व संदर्भ तपासून पाहण्यात येत आहेत, असेही धर्मरावबाबा अत्राम यांनी सांगितले. याप्रकरणी उमा खापरे, चंद्रशेखर बावनकुळे, भाई गिरकर, रमेशदादा पाटील, प्रसाद लाड आदींनी प्रश्न विचारला होता.

logo
marathi.freepressjournal.in