कृषी स्प्रेअर्सची बिल गेट्सकडून दखल; देशभरातील १० सर्वोत्तम स्टार्टअप्समध्ये नियो फार्मटेकची निवड

चितेपिंपळगाव येथील योगेश गवांडे या ध्येयवेड्या तरुणाने भारतीय कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या नियो फार्मटेकच्या नाविन्यपूर्ण स्प्रेअर्सची दखल जागतिक तंत्रज्ञान उद्योजक बिल गेट्स यांनी घेतली आहे.
कृषी स्प्रेअर्सची बिल गेट्सकडून दखल; देशभरातील १० सर्वोत्तम स्टार्टअप्समध्ये नियो फार्मटेकची निवड
Published on

सुजित ताजणे/छत्रपती संभाजीनगर

चितेपिंपळगाव येथील योगेश गवांडे या ध्येयवेड्या तरुणाने भारतीय कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या नियो फार्मटेकच्या नाविन्यपूर्ण स्प्रेअर्सची दखल जागतिक तंत्रज्ञान उद्योजक बिल गेट्स यांनी घेतली आहे. त्याला साथ लाभली अर्थातच मॅजिक या संस्थेची. ‘ग्रीनोव्हेशन एनर्जी चॅलेंज’मध्ये देशभरातील १० सर्वोत्तम स्टार्टअप्सपैकी एक म्हणून नियो फार्मटेकची निवड झाली असून, त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर जागतिक स्तरावर लक्ष केंद्रित झाले आहे.

भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात बिल गेट्स यांनी स्वतः नियो फार्मटेकच्या नियो सोलर स्प्रेअर आणि नियो बाहुबली स्प्रेअर यांचे प्रात्यक्षिक पाहिले. पारंपरिक इंधन-आधारित स्प्रेअर्सच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक असलेल्या या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांचे श्रम व खर्च दोन्हीही मोठ्या प्रमाणात कमी होतात.

स्टार्टअपचा प्रवास आणि यश

२०१८ मध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना योगेश गवांडे यांनी नियो फार्मटेकची संकल्पना मांडली. त्यांचा कॉलेज प्रोजेक्ट पुढे मराठावाडा एक्स्लेटर फॉर ग्रोथ एण्ड इन्क्युबेशन कौन्सिल ( Marathwada Accelerator for Growth and Incubation Council (MAGIC) या इनक्युबेशन सेंटरच्या मदतीने प्रत्यक्ष उत्पादनात बदलला. स्टार्टअपला सोशल एल्फा, सीओई फसल (एसटीपीआय, आयआयटी कानपूर, आयआयएमसीआयपी) यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांचे सहकार्य मिळाले, योगेश गावंडे यांना कॉलेज प्रोजेक्ट मॅजिकच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उत्पादनामध्ये विकसित झाला आशिष गर्दे,मिलिंद कंक, सुनील रायथता, प्रसाद कोकिळ, रितेश मिश्र यांनी त्याला व्यावसायिक दृष्टीने मार्गदर्शन आर्थिक मदत, बाजारपेठेतील प्रवेश आणि औद्योगिक ज्यामुळे उत्पादनाच्या संशोधन आणि विस्तार प्रक्रियेला वेग आला.

आज, नियो फार्मटेकने ५००० पेक्षा अधिक युनिट्सची विक्री, १०० हून अधिक रोजगार निर्मिती आणि ३ कोटींहून अधिक रुपयांचा महसूल मिळवला आहे. त्यांचे उत्पादन भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही पोहोचले आहे. उत्तर प्रदेश आणि ओडिशा या भागात गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा विस्तार करण्यात आला आहे.

'मेक इन इंडिया'चे उदाहरण

नियो फार्मटेकचा हा प्रवास ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे उत्तम उदाहरण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. "एका कॉलेज प्रोजेक्टपासून ते बिल गेट्स यांनी दखल घेण्यापर्यंत पोहोचणे हे भारतातील तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे," असे मॅजिकचे संचालक रितेश मिश्रा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in