

अमरावती : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ‘एमआयएम’ला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपने या पक्षासोबत सत्तेचा सारीपाट मांडला आहे. निवडणुकीमध्ये एकमेकांच्या रंगांची भीती दाखवून राजकारण करणारे हे दोन्ही पक्ष थेट सत्तेसाठी एकत्र आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेमध्ये भाजप आणि ‘एमआयएम’ची चक्क युती झाली आहे. त्यामुळे या युतीची चर्चा राज्याच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे. भाजपकडून ‘एमआयएम’ नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद देण्यात आले आहे. ‘एमआयएम’चे ३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे २ आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत गेला आहे. त्यामुळे अचलपूरमध्ये भाजप ‘एमआयएम’ सोबत एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी विविध राजकीय पक्षांकडून सुरू असल्याचे वारंवार दिसत आहे. राजकारण व विचारधारेबाबत कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप आणि ‘एमआयएम’या पक्षांचे नगरसेवक सत्ता समीकरणासाठी एकत्र आल्याचा प्रकार अकोट नगरपालिकेत उघडकीस आल्यानंतर राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली होती. त्यानंतरही संबंधित नेते भूमिका बदलण्यास तयार नसल्याचे दिसून येत असून भाजप आणि ‘एमआयएम’मधील संबंध कायम असल्याचे चित्र आहे. आता या समीकरणात काँग्रेसचाही समावेश झाल्याचे पाहायला मिळाले. हिवरखेड नगरपालिकेत भाजपच्या उपसभापतीपदाच्या उमेदवारासाठी काँग्रेसकडून सूचक तर ‘एमआयएम’चा नगरसेवक अनुमोदक असल्याचा प्रकार घडला आहे. आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या अकोट मतदारसंघांतर्गतच पुन्हा एकदा भाजप व ‘एमआयएम’मधील संबंध चर्चेचा विषय ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचे काय झाले? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
आ. प्रकाश भारसाकळेंना कारणे दाखवा नोटीस
भाजप आणि ‘एमआयएम’मधील संबंध सर्वप्रथम अकोट नगरपालिकेत समोर आले होते. भाजपच्या नेतृत्वाखाली अकोट विकास मंचाची स्थापना करताना ‘एमआयएम’च्या नगरसेवकांचा त्यामध्ये समावेश करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ‘एमआयएम’ आणि काँग्रेससोबत युती नकोच, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यानंतर भाजपने आमदार प्रकाश भारसाकळे यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावून खुलासा मागितला होता.