फडणवीसांचा पदमुक्तीचा निर्णय लांबणीवर; शपथविधीपर्यंत काम सुरू ठेवण्याची शहांची सूचना

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर रालोआच्या बैठकीच्या निमित्ताने फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यांनी गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी अशी दोन वेळा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शहा यांनी त्यांना सध्या तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रात ज्या काही सुधारणा करायच्या असतील त्याचा विचार करू, असे सांगितल्याचे समजते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून गिरीश महाजन यांना जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, महाजन यांनी असा कोणताही प्रस्ताव नाही. उलट आम्ही सर्व देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी आग्रही असल्याचे सांगितले. सरकार व पक्ष संघटन अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्यास ते सक्षम आहेत. पक्षाची राज्यातील कोअर कमिटीदेखील पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन ही भूमिका मांडणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या अपयशाची जबाबदारी घेत फडणवीस यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. विधानसभेसाठी पूर्णवेळ पक्षसंघटनात्मक काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. फडणवीसांच्या या भूमिकेमुळे खळबळ उडाली होती. केंद्रात रालोआच्या बैठकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस नागपूरमार्गे दिल्लीत पोहोचले. नागपूर येथील धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी रा. स्व. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी अशी दोन वेळा फडणवीस यांनी अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शहा यांनी त्यांना नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होऊ देत. त्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करू. त्यात महाराष्ट्राबाबत पुढची काय रणनीती आखायची याचा विचार करू. तोपर्यंत तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा, असे सांगितल्याचे समजते.

सरकारमध्ये तसेच पक्षसंघटनात्मक काम एकाचवेळी करण्यास फडणवीस पूर्ण सक्षम नेते आहेत. ते सरकारमध्येही राहतील व पक्षसंघटनेचेही काम पाहतील, असे आम्ही पक्षश्रेष्ठींना भेटून सांगणार आहोत. ते उपमुख्यमंत्रीपदी असलेच पाहिजेत व गृहमंत्रीपदही त्यांनीच सांभाळले पाहिजे. आमची कोअर कमिटी आमचे केंद्रातील नेते अमित शहा व जे. पी. नड्डा यांची भेट घेईल. त्यावेळी आमच्या या भावना त्यांच्या कानावर घालू, असे गिरीश महाजन म्हणाले. मला उपमुख्यमंत्रीपद मिळणार या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महाजन म्हणाले. पुढच्या तीन महिन्यांचा रोडमॅप आम्ही तयार करू. पुढचे तीन महिने कष्ट करू, असेही त्यांनी नमूद केले.

महाजनांनी केला उपमुख्यमंत्रीपदाचा इन्कार

देवेंद्र फडणवीस दिल्लीत असताना राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांना देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत या शक्यतांचा पूर्णपणे इन्कार केला. उलट राज्य भाजप पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये, असे आम्ही सर्वांनी त्यांना सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in