

मुंबई : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी महाराष्ट्रातून निवडून पाठवायच्या जागांसाठी चार उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. भाजपने अपेक्षेप्रमाणे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पक्षाच्या कोट्यातून उमेदवारी दिली आहे. याशिवाय पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. याशिवाय माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते ही दोन चर्चेत नसलेले उमेदवार देऊन भाजपने राजकीय वर्तुळाला धक्कातंत्राचा अनुभव दिला आहे.
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी येत्या १६ मार्च रोजी निवडणूक होत असून महाराष्ट्रातून सात उमेदवार राज्यसभेवर निवडून द्यायचे आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी दुपारी ३ वाजता संपत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने बुधवारी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
भाजपने अपेक्षेप्रमाणे रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा आपल्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी दोन वेळा म्हणजे २०१४ ते २०२० आणि २०२० ते २०२६ अशी सलग १२ वर्षे आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) उमेदवार म्हणून राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. आता आठवले हे तिसऱ्यांदा राज्यसभेत जातील. भाजपच्या उमेदवार यादीत आठवलेंच्या नावाला पहिले स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आठवले हे या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा होती. मात्र, आठवले हे त्यांच्याच पक्षाचे उमेदवार असतील, असा खुलासा भाजपच्या नेत्यांनी केला.
भाजपचे धक्कातंत्र
भाजपने आपल्या राज्यसभा उमेदवारांच्या यादीत पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. रामदास आठवले आणि विनोद तावडे यांचा अपवाद वगळता माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांची नावे राजकीय वर्तुळाला धक्का देणारी आहेत. राज्यसभेची उमेदवारी मिळालेल्या माया ईवनाते या नागपूर महापालिकेच्या माजी महापौर असून त्या आदिवासी समाजाच्या आहेत. तर धनगर समाजाच्या वडकुते यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य राहिलेल्या वडकुते यांना आता भाजपने राज्यसभेची संधी दिली आहे. भाजपने राज्यसभा उमेदवारांच्या माध्यमातून दलित, मराठा, आदिवासी आणि धनगर असे सोशल इंजिनिअरिंग साधले आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत गुरुवारी दुपारी ३ वाजता संपत आहे. त्यामुळे सर्व उमेदवार गुरुवारीआपले उमेदवारी अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
तावडेंचे पुनरागमन
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यापासून भाजपमध्ये राजकीय उपेक्षा सहन करणाऱ्या विनोद तावडे यांना भाजपने यावेळी राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप उमेदवारांच्या यादीत तावडेंचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, २०१४ ते २०१९ या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विविध खात्यांची मंत्रिपदे भूषविलेल्या तावडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली होती. तरीही पक्षावर नाराज न होता तावडे यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामात स्वतःला झोकून दिले. बिहारसह विविध राज्यांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणाऱ्या तावडे यांना यावेळी राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपने त्यांच्या कामाची पावती दिली आहे.