भाजप तरुणाईला घालणार साद; नागपुरात ४ मार्चला महामेळावा, ‘४०० पार’चे लक्ष्य

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली असून, सर्वच घटकांना सोबत घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. मुळात युवक, महिला, सर्वसामान्य जनता यांना लुभावण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच...
भाजप तरुणाईला घालणार साद; नागपुरात ४ मार्चला महामेळावा, ‘४०० पार’चे लक्ष्य

राजा माने/मुंबई

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली असून, सर्वच घटकांना सोबत घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. मुळात युवक, महिला, सर्वसामान्य जनता यांना लुभावण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच नवमतदारांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ४ मार्च रोजी नागपुरात भाजयुमोच्या वतीने युवकांचा महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून भाजपचे युवा संघटन मजबूत करतानाच आगामी निवडणुकीत युवकांची शक्ती कशी पाठीशी राहील, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या निवडणुकीत ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपचे नेते, पदाधिकारी कामाला लागले असून, प्रत्येक राज्यात जवळपास सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भाजपने सर्वप्रथम प्रबळ विरोधकांवर घाव घालत विरोधकांचे बळ कसे कमी करता येईल, यादृष्टीने जोरदार प्रयत्न केले गेले. हे प्रयत्नदेखील बऱ्यापैकी यशस्वी झाले. कारण २०१९ नंतर बरेच मित्रपक्ष भाजपला सोडून गेले होते. मात्र, २०२४ च्या निवडणुकीअगोदर बऱ्याच पक्षांची साथ मिळविण्यात भाजपला यश आले आणि सोबतच विरोधकांचे बळ कमी करण्याची रणनीतीही बरीच यशस्वी झाली. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून, सर्वच राज्यांत तसे प्रयत्न सुरू केले आहेत.

याच प्रयत्नाचा भाग म्हणून महाराष्ट्रात तरुणाई आणि नवमतदारांना साद घालण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने नागपुरात ४ मार्च रोजी युवकांचा महामेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित राहणार असून, युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या हे मुख्य आकर्षण असणार आहेत. कारण नवमतदारांना आकर्षित करण्याचे काम ते करणार आहेत. त्यादृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. नागपुरातील रविनगर येथील विद्यापीठाच्या मैदानात हा महामेळावा होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित राहणार आहेत.

नवमतदारांचा कल महत्त्वाचा

भाजप सर्वच समाजातील घटकांना वेगवेगळ्या प्रकारे साद घालत आहे. युवा, महिला आणि गरीब जनता यांना आकर्षित करतानाच युवक, नवमतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कारण नवमतदार मोदींच्या विजयात निर्णायक भूमिका निभाऊ शकतात, याची खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. त्यामुळे तरुण वर्ग विशेषत: नवमतदार यांना लुभावण्यासाठी नागपुरात महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला जवळपास १ लाख तरुण उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in