भाजपमध्ये (BJP) अनेक मोठमोठे नेते प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळेंना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, "महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते येत्या काळामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. आगामी काळामध्ये प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल" असा दावा त्यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना केला.
शिवसेना संपवण्याचे काम भाजप करत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, "शिवसेना संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींना यायची गरज नाही. त्यासाठी संजय राऊतच पुरेसे आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबई पुरामध्ये बुडवली, आम्ही मुंबईला या पुरातून बाहेर काढत आहोत. पंतप्रधान मोदी हे विकासकामांसाठी मुंबईत येणार आहेत. शिवसेनेसाठी आम्ही छोटे कार्यकर्त्ये पुरेसे आहोत. उलट त्यांच्याकडचे सगळे लोक आमच्याकडे येण्यास उत्सुक आहेत."
त्यानंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरणाच्या युतीबाबत ते म्हणाले की, "जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत, ते प्रकाश आंबेडकरांना काय सांभाळणार? उद्धव ठाकरेंसोबत कुणीही राहू शकत नाही. उद्धजींच्या रक्तातच युती टिकवणे नाही. कुणाचाही सन्मान ठेवणे हे त्यांना जमत नाही. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत" असा टोलाही भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी लगावला.