मुंबईच्या ६ जागांवर भाजपचा डोळा; फोडाफोडीनंतरही खात्री पटेना, मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न

राज्यात पक्ष फोडाफोडीचे राजकारण करून ‘मिशन ४५’ यशस्वी करण्याचा चंग भाजपने बांधला आहे.
मुंबईच्या ६ जागांवर भाजपचा डोळा; फोडाफोडीनंतरही खात्री पटेना, मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न
(संग्रहित छायाचित्र)

राजा माने/मुंबई

राज्यात पक्ष फोडाफोडीचे राजकारण करून ‘मिशन ४५’ यशस्वी करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाटून भाजपने शिंदे गट आणि अजित पवार गटाचे इंजिन जोडले. राज्यात ‘ट्रिपल इंजिन’ झाल्यामुळे भाजप महायुतीची ताकद वाढल्याचे चित्र आहे. परंतु फोडाफोडीच्या या राजकारणानंतरही भाजपला मुंबईतील ६ जागांची अजूनही खात्री वाटत नाही. त्यामुळे आता या जागा जिंकण्यासाठी मुंबईत मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी भाजपच्या वाटाघाटी सुरू आहेत.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर सातत्याने आसूड ओढले आहेत. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावर, तर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले सख्य आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, मनसे युती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही युती लवकरात लवकर व्हावी, यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे सातत्याने गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे भाजप आगामी निवडणुकीअगोदर आणखी एक भिडू आपल्यासोबत घेण्यात यशस्वी होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मनसेची साथ मिळविण्यासाठी या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्रा देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आता तर सोमवारी थेट मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जाऊन थेट राज ठाकरे यांची भेट घेत तब्बल १ तास चर्चा केली. त्यामुळे भाजप-मनसे युतीची चर्चा रंगली आहे. आमदार आशिष शेलार थेट भाजप पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे महायुतीत सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपने मुंबईत मजबूत स्थितीत असलेली शिवसेना फोडली. त्यामुळे मुंबई, उपनगरांतील बरेच नेते, पदाधिकारी महायुतीत सोबत असलेल्या शिवसेना शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे ठाणे, पालघर, कल्याणसोबत मुंबईतही शिंदे यांची ताकद वाढली आहे. यासोबतच राष्ट्रवादीतही उभी फूट पाडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मोठा गट भाजपने सोबत घेतला आहे. त्यामुळे राज्यात भाजप महायुतीची ताकद वाढली आहे. परंतु मुंबईत अजूनही लोकसभेच्या ६ जागा जिंकण्याची खात्री भाजप नेत्यांना वाटत नाही. त्यामुळे विरोधकांचा सुपडा साफ करण्यासाठी भाजपला मनसेची गरज वाटत आहे. त्यासाठी भाजपने तशी रणनीती आखली असून, कोणत्याही परिस्थितीत मनसेला सोबत घ्यायचेच, असा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शेलारांची राज ठाकरेंशी तब्बल एक तास चर्चा

मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवारी सकाळी थेट शिवतीर्थावर जाऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत तब्बल १ तास चर्चा केली. त्यामुळे युतीच्या दृष्टीने भाजपने हे पुढचे पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी शेलार खास भाजप पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन आल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना थेट दिल्लीतून बोलावणे आले असल्याचेही समजते. त्यावर राज ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in