
पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी आता महाविकासह आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर, दुसरीकडे आता भाजपसाठी पुण्याचे किंगमेकर खासदार गिरीश बापट प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे प्रचाराला सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी प्रचारासाठी पुढे येण्याचा निर्णय घेतला. आज ते नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.
खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली टिळक कुटुंबीयांच्या केसरी वाड्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यसुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पुण्यात आहेत. प्रचाराची रणनीती आणि पोटनिवडणुकीचे नियोजन करण्यासाठी बैठकींचे सत्र सुरु आहेत.