राज्यसभा निवडणुक वाद केंद्रीय आयोगाच्या कोर्टात भाजप, मतमोजणी लांबणीवर

परस्परांच्या मतदानाविरोधात तक्रारी केल्याने राज्यसभा निवडणुकीचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे
Sanjay Raut
Sanjay RautANI
Published on

महाविकास आघाडी आणि भाजपने परस्परांच्या मतदानाविरोधात तक्रारी केल्याने राज्यसभा निवडणुकीचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. यावर आयोगाचा निर्णय लवकर न आल्याने मतमोजणीला उशीर झाला. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेच्या सुहास कांदे यांची मते बाद करण्याची मागणी केली, तर महाविकास आघाडीने भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांची मते बाद करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूकडच्या या मागण्यांमुळे आयोगाने सुनावणीसाठी मतमोजणीला स्थगिती दिली आहे.

या निवडणुकीत मतदान करून मतपत्रिका पक्षाच्या प्रतोदांना दाखवावी लागते, मात्र गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हातात दिल्याचा आक्षेप भाजपच्या पराग आळवणी यांनी घेतला. त्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनीही आक्षेप घेऊन या दोघांची मते बाद करण्याची मागणी केली. ती स्थानिक अधिकाऱ्यांनी नाकारल्याने भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाचे दार ठोठावले. महाविकास आघाडीकडूनही भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांच्याविरोधात आक्षेप घेतला. सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक प्रतिनिधी व्यतिरिक्त इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवल्याचा, तर रवी राणा यांनी हातातील हनुमान चालीसा विधान भवनाबाहेर दाखविल्याचा आक्षेप महाविकास आघाडीकडून घेण्यात आला आहे. आघाडी तसेच भाजप दोघांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परस्परांविरोधात तक्रारी केल्या आहेत. आयोगाने तक्रारी ऐकून घेईपर्यंत मतमोजणीला स्थगिती दिल्याने मतमोजणी रखडली. दरम्यान, शिवसेना नेते व निवडणुकीतील उमेदवार संजय राऊत यांनी ‘ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू झाला. आम्हीच जिंकू’ अशा शब्दांत भाजपवर या प्रकाराबाबत टीकास्त्र सोडले. तर रवी राणा यांनी ‘हनुमान चालीसाचे पुस्तक खिशातून घेऊन विधानभवनात जाणे हा गुन्हा आहे का’ असा सवाल केला आहे. मतदानासाठी जगताप, टिळक रुग्णवाहिकेतून निवडणूक अतिशय अटीतटीची असल्याने कोणत्याही पक्षाने थोडादेखील गाफिलपणा दाखवला नाही.

भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोन्ही आमदार आजारी आहेत. आजारी असूनही कार्डियाक रुग्णवाहिकेतून पुणे-मुंबई असा तीन-सव्वातीन तासांचा प्रवास करून मतदानासाठी आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांचे दारातच फडणवीस यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केले. टाळ्या वाजवून भाजप आमदारांनी जगताप यांना ‘सॅल्यूट’ केला. रुग्णवाहिकेतून उतरविल्यानंतर जगताप यांना व्हीलचेअरवरून थेट मतदानाच्या ठिकाणी नेण्यात आले. जगताप हे दुपारी १२.१५ वाजता विधानभवनात आले होते. त्याआधी सकाळी १०.१५ वाजता मुक्ता टिळक याही रुग्णवाहिकेतूनच आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची संधी न मिळाल्याने एकूण २८५ आमदारांनी मतदान केले.

logo
marathi.freepressjournal.in