

मुंबई : नगरपरिषद व नगरपंचायत समित्यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे दिग्गज नेते उतरले, तर दुसरीकडे भाजपने अंतर्गत केलेल्या सर्व्हेतून भाजपचे १७५ नगराध्यक्ष होतील, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपरिषद व नगरपंचायत समितीच्या निकालानंतर भाजपच महायुतीत मोठा भाऊ असेल, असा अंदाज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पुढील २ दिवसांत मतदान होऊन ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत भाजपने आपली मोठी टीम प्रचारासाठी मैदानात उतरवली असून अंतर्गत सर्व्हेदेखील करण्यात आला आहे. भाजपच्या या सर्व्हेनुसार राज्यात भाजपचे १७५ नगराध्यक्ष विजयी होतील. तर, महायुतीमध्ये आणि निवडणूक निकालांमध्ये भाजपच मोठा भाऊ असणार आहे. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांना मोठ्या विजयाचा विश्वास आहे.
नगरपालिका निवडणुकांचा प्रचार सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत करता येणार आहे. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. गेल्या आठवड्यापासून महायुतीचे नेते प्रचाराची जबाबदारी पार पाडत आहेत. तर आता भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर आला असून या नगरपरिषद निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ ठरणार असल्याचे भाजपकडून बोलले जाते. राज्यात भाजपचे १७५ नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज सर्वेक्षणात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रविंद्र चव्हाण यांनी विविध जिल्ह्यात जाऊन जोरदार प्रचार सुरू केला आहे. राज्यात नगराध्यक्षपदासाठी २४२ ठिकाणी भाजप, तर ४६ ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे सर्वाधिक जागांवर भाजपचे उमेदवार असल्याने भाजपच मोठा भाऊ ठरेल, असा विश्वास सर्वेक्षणातून समोर आला आहे आहे.
३ डिसेंबर रोजी लागणार निकाल
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जबरदस्त मोर्चेबांधणी केली आहे. निवडणुकीत आपल्या जागा अधिकाधिक निवडून याव्यात यासाठी भाजप व शिंदे सेनेकडून प्रचारात दिग्गज नेते उतरली. स्वतः एकनाथ शिंदे यांनी मैदान संभाळले असून फडणवीस यांनीही प्रचाराचा धडाका लावला आहे. सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराचा अखेरचा टप्पा असून शिवसेना व भाजपचे प्रमुख नेते आपल्याला मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. मात्र १७५ जागांवर विजय मिळणार, असा भाजपने केलेल्या सर्व्हेचा अंदाज असला तरी ३ डिसेंबर रोजी कोण मोठा भाऊ ठरणार, हे चित्र स्पष्ट होईल.