मुख्यमंत्री शिंदे अडकले चक्रव्यूहात; भाजपचा वाढता दबाव अन् पक्षांतर्गत असंतोष

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेनेच्या वतीने किरण सामंत लढण्यास इच्छुक आहेत, तर तिथे भाजपने नारायण राणेंचे नाव निश्चित केल्याचे समजते. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथेही भाजपचा दावा आहे. मुंबई उत्तर-पश्चिम येथेही भाजपचा दावा सांगत आहे. लोकसभेलाच जर असे असेल तर विधानसभेला काय होणार? असा प्रश्न शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे.
मुख्यमंत्री शिंदे अडकले चक्रव्यूहात; भाजपचा वाढता दबाव अन् पक्षांतर्गत असंतोष

मुंबई : भाजप शिंदे सेनेच्या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघांवर नव्या सर्व्हेंचा संदर्भ देत हक्क सांगत आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षातीलच बंडखोरांच्या दबावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंची अवस्था चक्रव्यूहात सापडल्यासारखी झाली आहे.

त्यातूनही अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रयत्न सुरू आहे. किमान जेवढे खासदार, तेवढी तरी उमेदवारी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. परंतु त्यांना एकीकडे जागांसाठी कसरत करावी लागत आहे, तर दुसरीकडे आपल्याच नेत्यांच्या बंडखोरीचा सामना करण्याची वेळ आली आहे. ठाणे हा शिंदे गटाचा गड मानला जातो, तरीही भाजपचा या जागेवर दावा आहे. अमरावतीत भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तिथे आनंदराव अडसूळ यांनी दावा केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेनेच्या वतीने किरण सामंत लढण्यास इच्छुक आहेत, तर तिथे भाजपने नारायण राणेंचे नाव निश्चित केल्याचे समजते. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथेही भाजपचा दावा आहे. मुंबई उत्तर-पश्चिम येथेही भाजपचा दावा सांगत आहे. लोकसभेलाच जर असे असेल तर विधानसभेला काय होणार? असा प्रश्न शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

विजय शिवतारे यांची तलवार म्यान?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी थेट बारामतीत बंड पुकारले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बुधवारी रात्री विजय शिवतारे यांना ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावून घेऊन मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांची रात्री उशिरापर्यंत समजूत काढली. त्यामुळे ते माघार घेतील, असे सांगितले जात आहे.

संजय गायकवाड यांची बंडखोरी

बुलडाणा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रताप जाधव हे विद्यमान खासदार आहेत. त्यांना शिंदे सेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. याच मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचेच आक्रमक आमदार म्हणून ओळख असलेले संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बुलडाण्यात बंडखोरीचे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटात अस्वस्थता

शिंदेंच्या शिवसेनेत जागावाटपावरून प्रचंड अस्वस्थता आहे. निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर आमच्या जागा भाजप हिसकावून घेत असल्याची भावना शिवसेनेत आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, कार्यकर्ते नाराज असल्याचे‍ दिसून येत आहे. शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांनी तर आमच्या जागांवरच हट्ट कशाला? भाजपच्या जागा आम्ही मागितल्या का, असा सवाल केला आहे. तसेच ‘एक घाव, दोन तुकडे’ झालेच पाहिजेत, अशी भाषा केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in