Kirit Somaiya : उद्धव ठाकरेंनी भगव्याचा त्याग केला आणि... ; किरीट सोमय्यांचा घणाघात

आज कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे दर्शन घेत भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीवर अनेक टीका केल्या
Kirit Somaiya : उद्धव ठाकरेंनी भगव्याचा त्याग केला आणि... ; किरीट सोमय्यांचा घणाघात

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन देवी अंबाबाईचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर किरीट सोमय्या पहिल्यांदाच कोल्हापुरात आले. यानंतर त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासहित महाविकास आघाडीवरही शरसंधान साधले. तसेच, 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भगव्याचा त्याग करत हिरवा झेंडा हातात घेतला आहे' अशी टीकादेखील केली. तसेच, " मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वचन दिलेलं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ प्रकरणाची चौकशी होणारच आहे," असेदेखील ते म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, "हसन मुश्रीफांच्या घोटाळ्याचे मी सर्व पुरावे दिले आहेत. म्हणूनच ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. कोलकत्यातील बोगस कंपनीतून त्यांना १५० कोटी मिळाले. रजत कंपनी व माऊंट कंपनी अस्तित्वातच नाही. तरीही अशी काय किमया झाली? की या वित्त कंपन्यातून मुश्रीफ यांना ४९ कोटी ८५ लाख रुपये मिळाले." असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तर पुढे ते म्हणाले की, "जावयाच्या कंपनीला कंत्राट मिळावे म्हणून त्यांनी राज्यभरातील ग्रामपंचायतींना फर्मान जारी केले. त्यानुसार ग्रामपंचायती मुश्रीफ यांच्या जावयाच्या कंपनीला वर्षाला ५० हजार रुपये देणार होती. त्यांच्या जावयाच्या कंपनीला वर्षाला १५० कोटी मिळणार होते. त्यासाठी अध्यादेश काढण्यात आला. नंतर तो रद्द करण्यात आला. हा अध्यादेश का काढण्यात आला? कोणाच्या सांगण्यावरून काढण्यात आला? याची चौकशी केली जाणार असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला दिले," अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

हसन मुश्रीफ हे किरीट सोमय्यांवर आरोप करताना म्हणाले होते की, ते विशिष्ट समुदायाच्या व्यक्तींना टार्गेट करतात'. यावर किरीट सोमय्या म्हणाले की, "शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर, 'हसन मुश्रीफांनी केलेले विधान मला मान्य आहे' असे सांगावे. भगव्याचा त्याग करून हिरवा झेंडा घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी हे विधान मान्य आहे असे सांगावे. घोटाळे केले त्यावेळी धर्म आठवला नाही का?" असा प्रश्न यावेळी किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in