विशेष प्रतिनिधी/मुंबई
जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यंदा सहाव्यांदा नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे मैदानात आहेत. दानवे यांचा वैयक्तिक संपर्क आणि महायुतीच्या नेत्यांची साथ, यामुळे जालन्यात भाजपचे पारडे जड वाटायला लागले होते. परंतु जालन्यातही युतीत धुसफूस सुरू असल्याचे चित्र आहे. कारण माजी मंत्री अर्जुन खोतकर हे शिंदे गटाचे नेते आहेत. परंतु त्यांच्यात सुसंवाद नसल्याचे चित्र आहे. कारण दोघे एकत्र येऊनही त्यांचा संवाद झालेला नाही. त्यामुळे याचा फटका दानवेंना बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, अर्जुन खोतकर यांचे बंधू अनिरुद्ध खोतकरही महाविकास आघाडीसोबत असल्याचेही बोलले जात आहे. अगोदरपासूनच माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात मतभेद आहेत. परंतु महायुतीत असल्याने युतीधर्म पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ते जुळवून घेतील, असे वाटत होते. परंतु महायुतीच्या नेत्यांनी अद्याप याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. मुळात या दोन नेत्यांनी एकमेकांविरोधात अद्याप एक शब्दही काढलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मतभेदाची फारशी चर्चा नाही. परंतु आतापर्यंत युतीचा धर्म म्हणून एकत्रित आल्याचे दिसलेले नाही. त्यामुळे जालन्यात महायुतीत धुसफूस असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
त्यातच जालन्यात सोमवारी ब्राम्हण समाजाचा उपनयन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरही उपस्थित होते. परंतु दोन्ही नेते वेगवेगळ्या ठिकाणी बसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात जवळपास अर्धातास तिथेच बसलेले होते. परंतु त्यांच्यात कुठलाही संवाद झालेला नाही. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांत चर्चा रंगल्याचे बोलले जात आहे. खरे तर १५ दिवसांपूर्वीच त्यांच्यातील वाद मिटल्याचे बोलले जात होते. तसेच दोघांनीही एकत्रित प्रचार करण्याचा निर्धारही बोलून दाखविला होता. त्यामुळे दोन्ही नेते एकत्रितरित्या प्रचार करतील, अशी चर्चा होती.