छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचं का वाढलं टेन्शन? भाजपचा मोठा नेता ठाकरे गटात का जातोय?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार
Published on

छत्रपती संभाजीनगर: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर राजू शिंदे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राजू शिंदे ७ जुलै रोजी सात ते आठ नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

संदिपान भुमरेंनी भाजपचे आभारही मानले नाहीत...

शिवसेना पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी नव्यानं पक्षबांधणीला सुरुवात केली. भाजपविरोधात महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं, यात उद्धव ठाकरे यांचा सिंहाचा वाटा असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून पक्षाची पुनर्बांधणी सुरु आहे. ७ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भाजप नेते आणि माजी महापौर राजू शिंदे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे, ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी शिंदे गट आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाच्या उमेदवार राहिलेले संदिपान भुमरे यांना विजयी करण्यासाठी भाजपनेही खूप मेहनत घेतली. पण भुमरे यांच्या विजयानंतर शिंदे गटाने भाजपचे आभारही मानले नसल्याचा आरोप राजू शिंदे यांनी केला आहे.

तर भाजपमध्ये राहून काय उपयोग?

ते म्हणाले की, "आमच्यासोबत सध्या पाच-सहा नगरसेवक येतील आणि येत्या काळात आणखी नगरसेवक येतील. भाजप सोडण्याचं कारण वेगवेगळी आहेत. ही जागा शिंदे गटानं जिंकली नव्हती. तरीही ही लोकसभेची जागा शिंदे गटाला सोडण्यात आली. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं जीव लावून काम केलं. त्यामुळं उमेदवाराचा (संदिपान भुमरे) विजय झाला, पण संभाजीनगर पश्चिमच्या आमदारांनी (संजय शिरसाठ) भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभारही मानले नाहीत. उलट त्यांनी आम्ही मोठा भाऊ असं ट्वीट केलं. भाजपच्या जीवावर तुम्ही निवडून आलात आणि तुम्ही मोठे भाऊ असं म्हणताय. भाजप कार्यकर्त्यांच्या हे जिव्हारी लागलंय आणि विधानसभेला जर त्यांचंच काम करायचं असेल, प्रत्येक निवडणुकीत शिंदे गटाचं काम करायचं असेल तर भाजपमध्ये राहून उपयोग काय? आता जनतेची मागणी आहे, प्रश्न मांडायचे असतील तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेलं पाहिजे."

संजय शिरसाठ यांच्याविरोधात लढवली होती निवडणूक-

राजू शिंदे यांनी २०१९ मध्ये छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान संजय शिरसाठ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी संजय शिरसाठ यांनी ४००५४ मतांनी विजय मिळवला होता. या निवडणूकीत काँग्रेस उमेदवारांचा अर्ज बाद झाल्यानं संजय शिरसाठ विरुद्ध राजू शिंदे अशी मुख्य लढत झाली होती. त्यातसंजय शिरसाठ यांना तब्बल ८३०९९ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांना ४३०४५ मते पडली. दरम्यान यंदा महायुतीमधून संजय शिरसाठ यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता असल्यानं राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याचं बोललं जात आहे.

तर मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार...

यावर प्रतिक्रिया देताना राजू शिंदे म्हणाले की, "आमच्या स्थानिक अडचणी आहेत. मी शिवसेना ठाकरे गटात गेलो आणि लगेच निवडून येईन असं आहे का? मला तिकीट मिळालं पाहिजे. शिवसेनेचे जुने पदाधिकारी असतील किंवा माझ्यासोबत आलेले कार्यकर्ते असतील, कार्यकर्त्यांनी निवडणूक अंगावर घेतली पाहिजे, तेव्हा मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार. परंतु १९९५ काम करतोय, मी १५ वर्षपण थांबलो असतो. पण थांबून काही उपयोग नाही, हे वर जे निर्णय होतायत ते कार्यकर्त्यांना पटत नाहीत. स्थानिक नेतेही विचारात घेत नाहीत."

logo
marathi.freepressjournal.in