पंकजा मुंडे यांची बदनामी करण्याचे षडयंत्र भाजप नेत्यांकडून रचले जातंय - चंद्रशेखर बावनकुळे

भाजपमधील एक गट पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करत आहे. कोणीतरी हे जाणूनबुजून करण्याचा प्रयत्न करत आहे
पंकजा मुंडे यांची बदनामी करण्याचे षडयंत्र भाजप नेत्यांकडून रचले जातंय - चंद्रशेखर बावनकुळे

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडून पंकजा यांना डावलले जात असल्याची चर्चाही अनेकदा झाली होती. मात्र, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबत मोठा खुलासा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांची बदनामी करण्याचे षडयंत्र भाजप नेत्यांकडून रचले जात असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे स्वतः मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात प्रचार सभा घेत आहेत. दरम्यान, त्यांनी जालना येथे प्रचार सभाही घेतली. तेव्हा आपल्या भाषणादरम्यान ते म्हणाले की, भाजपमधील एक गट पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करत आहे. कोणीतरी हे जाणूनबुजून करण्याचा प्रयत्न करत आहे. बीडमधील मंचावरून व्हायरल झालेल्या व्हिडिओवर बोलताना बावनकुळे म्हणाले, "पंकजाताईंचा सन्मान करण्यासाठी माझ्यानंतर बोलण्याचा आग्रह मीच केला होता. पंकजा मुंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत आणि त्यांचा अपमान करणे हास्यास्पद आहे." पक्षातील काही लोक पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in