भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी! उद्धव ठाकरेंचा घणाघात: अमित शहांनी वचन पाळले नाही

अमित शहा यांनी २०१९ मध्ये दिलेलं वचन पाळलं नाही ते पाळलं असतं तर आज संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी असती आणि मोदींना महाराष्ट्राच्या वाऱ्या कराव्या लागल्या नसत्या, असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.
भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी! उद्धव ठाकरेंचा घणाघात: अमित शहांनी वचन पाळले नाही

नाशिक : बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी. ही भेकडांची पार्टी आहे. भाकड तर आहातच पण भेकडही आहात. नेता कुणीही देऊ शकत नाही, कार्यकर्तेही नाहीत. आम्ही हिंदू आहोत, असे सांगता, असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाहीत आणि होणारही नाहीत. अमित शहा यांनी २०१९ मध्ये दिलेलं वचन पाळलं नाही ते पाळलं असतं तर आज संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी असती आणि मोदींना महाराष्ट्राच्या वाऱ्या कराव्या लागल्या नसत्या, असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

नाशिकमध्ये मंगळवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टीका केली. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी रामनवमीपर्यंत थांबला असता, तर काही बिघडलं नसतं. राम मंदिरासाठी आणि कलम ३७० हटवण्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा दिलाच होता. हिंदूंवरचे अत्याचार कमी होण्यासाठीही आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता. पण जेव्हा कठीण काळ होता तेव्हा शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली.

अटलबिहारी वाजपेयी यांना जेव्हा केराच्या टोपलीत टाकायला निघाले, तेव्हा शिवसेनाप्रमुख तुमच्या मदतीला धावले. ती शिवसेना आज तुम्ही संपवायला निघाला आहात? हे तुमचं हिंदुत्व आहे? संपवायचं असेल तर मैदानात या. आम्ही मैदानात आहोत. मात्र स्वत: कडेकोट बंदोबस्तात राहणार. आमचं कवच काढून घेणार पण मी त्यांना सांगतो आज माझ्यासमोर आहे ते आमचं कवच आहे काढून घ्या. पोलीस, निमलष्करी दल, बॉम्ब जॅमर इतकं सगळं करून तुम्ही ५६ इंची छाती दाखवणार का? माझ्या शेतकऱ्याची हडकुळी छाती तुम्हाला भारी पडणार आहे,” अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

सत्ता आल्यावर तुमच्या तंगड्या गळ्यात घालतोच

“भाजपकडे कार्यकर्तेच नाहीत. शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे कारण मी वारसा घेऊन पुढे चाललो आहे. मात्र भाजपचे लोक म्हणजे दंगल झाली की पळणारी अवलाद. आमच्या नेत्यांवर, शिवसैनिकांच्या घरी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या धाडी पडतात. घर आमच्या कार्यकर्त्याचे, तिथे हे लोक पाय पसरून बसतात. येऊ दे आमची सत्ता, तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे.

माणसे वापरा आणि फेका ही भाजपची नीती

माणसांना वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. त्यांना मित्रपक्षही नकोसे झाले आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून प्रचार करून घेतला आणि त्यांना मामा बनवलं. देवेंद्र फडणवीसांचा वापर केला आणि फेकून दिलं. मिंध्यांचाही वापर करून फेकतील, अशीही टीका त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in