उल्हासनगर : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबारप्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार गणपत गायकवाडसह पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली आहे.
बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आरोपींना उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालयाच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.
द्वारली येथील जमीनीच्या वादातून कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणचे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुद गोळीबार केला होता. या प्रकरणात १४ फेब्रुवारी रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सर्व आरोपींना उल्हासनगरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालायाच्या आवारात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली होती.
त्यामुळे न्यायालयाच्या परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. मात्र एक तास चाललेल्या या सुनावणीत आरोपी आणि पोलिस अशा दोन्ही बाजूंनी झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील यांनी दिली. तसेच आरोपीची रवानगी तळोजा न्यायालयात करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांची निराशा
न्यायालयीन कोठडीच्या सुनावणीनंतर आमदार गणपत गायकवाड आणि इतर आरोपींना कोणत्या कारागृहात नेणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असतांना शेकडो कार्यकर्त्यांनी आधारवाडी कारागृहात बाहेर गर्दी केली होती. मात्र गायकवाड यांना घेऊन जाणारे पोलीस वाहन थेट नेवाळी मार्गे नवी मुंबई दिशेने वळल्याने त्यांना तळोजा कारागृहात नेण्यात आल्याचे समजताच कार्यकर्त्यांची मात्र निराशा झाली.