पक्षाने संधी दिल्यास आनंदाने निवडणूक लढवेन; भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता

ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापही महायुतीच्या जागेचा उमेदवार जाहिर करण्यात आलेला नाही. शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातही केली असताना महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. ठाण्याची जागा शिवसेना भाजपला सोडायला तयार नाही तर भाजप अजूनही या जागेसाठी आग्रही आहे.
पक्षाने संधी दिल्यास आनंदाने निवडणूक लढवेन; भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता
Published on

ठाणे : ठाणे लोकसभेचा तिढा अद्याप सुटला नसला तरी पक्षाने संधी दिल्यास ठाणे लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दर्शवली आहे. स्वतः संजय केळकर यांनी ही भूमिका मांडली असल्याने त्यांच्या या भूमिकेमुळे मात्र शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. केळकर यांच्या या वक्तव्यामुळे अजूनही ठाणे लोकसभेवर भाजप आग्रही असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापही महायुतीच्या जागेचा उमेदवार जाहिर करण्यात आलेला नाही. शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातही केली असताना महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. ठाण्याची जागा शिवसेना भाजपला सोडायला तयार नाही तर भाजप अजूनही या जागेसाठी आग्रही आहे. परिणामी हा तिडा अद्याप सुटलेला नसताना दोन्ही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची नावे मात्र चर्चेत आहेत. यामध्ये सुरुवातीला भाजपचे आमदार संजय केळकर यांचे नावही चर्चेत होते. मात्र नंतर हे नाव मागे पडून रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, संजीव नाईक आणि नरेश म्हस्के यांची नावे चर्चेत आलीत.

या सर्व घडामोडींमध्ये भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने आता त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, भाजपला ही जागा मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत, असे स्पष्ट मत संजय केळकर यांनी व्यक्त केले. पक्षाने संधी दिली तर मी स्वतः आनंदाने लढायला तयार असून कार्यकर्ते मला नक्कीच मदत करतील असा दावा केळकर यांनी केला आहे. ठाणे लोकसभा क्षेत्रात भाजपच्या आमदार आणि नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने आमचाच दावा असल्याचे केळकर यांनी म्हटले आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात रामभाऊ कापसे, रामभाऊ म्हाळगी हे खासदार होऊन गेले. त्यावेळी गणिते वेगळी होती. कालांतराने धर्मवीर आनंद दिघे यांनी शिवसेनेला जागा खेचून घेतली आणि प्रकाश परांजपे तीनदा खासदार झाले. आता आमचे आमदार देखील अधिक आहेत. नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर येथे नगरसेवक देखील आमचे जास्त आहेत. जर भाजपला उमेदवारी मिळाल्यास खऱ्या अर्थाने ३० वर्षांनंतर भाजपचा कार्यकर्ता सुखावेल.

- आ. संजय केळकर, भाजप

logo
marathi.freepressjournal.in