Girish Bapat : भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Girish Bapat : भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

भाजपचे (BJP) खासदार आणि पुण्यातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज पुण्यात निधन झाले

भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज पुण्यात निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

गिरीश बापट हे पुण्यातील किंगमेकर म्हणून ओळखले जातात. नुकतेच त्यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीदरम्यान चिलचेअरवरून प्रचारसभेत भाग घेतला होता. तसेच, त्यांनी मतदानाचा हक्कदेखील बजावला होता. आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक असलेले पुण्यातील गिरीश बापट हे १९७३पासून राजकारणात सक्रिय होते. पुण्यातील भाजपच्या वाटचालीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. कामगार चळवळीपासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर १९८३मध्ये पुणे महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सलग ३ वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. दरम्यान, आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. तसेच, १९९५मध्ये ते कसबा पेठ मतदारसंघात आमदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर सलग ५ वेळा ते या भागातून आमदार म्हणून निवडून आले होते. यावेळी त्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गिरीश बापट यांनी अनेक खात्यांची मंत्रीपदे सांभाळली, तसेच पुण्याचे पालकमंत्री म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले. २०१९मध्ये ते पुण्याचे खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. गेले काही महिन्यांपासून ते एका दुर्धर आजाराशी लढा देत होते. तरीही काही दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. प्रचारासाठी त्यांनी व्हीलचेअरवरून हजेरी लावली. तसेच, पोटनिवडणुकीमध्ये मतदानाचा हक्कदेखील बजावला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in