पेणमध्ये निवडणुकीची चाहूल ; पेण अर्बन बँकेच्या ठेविदारांसाठी आशेचा किरण ? की पुन्हा नवे गाजर !

खासदार किरीट सोमय्या यांची ही भेट म्हणजे निवडणुकी पूर्वीची वातावरण निर्मिती असल्याचे सांगितले
पेणमध्ये निवडणुकीची चाहूल ; पेण अर्बन बँकेच्या ठेविदारांसाठी आशेचा किरण ? की पुन्हा नवे गाजर !

सप्टेंबर २०१० पासून आर्थिक घोटाळा झाल्याने बंद पडलेल्या पेण अर्बन बँकेच्या दीड लाखांच्या वर खातेदारांना अद्याप न्याय मिळालेला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, कॉंग्रेसचे अशोक चव्हाण या सर्वांनी वेळोवेळी आपापल्या पक्षाची सरकार असतांना पेण बँकेतील खातेदारांना सरकार न्याय देईल, असे आश्वासन दिले होते. आणि आता पुन्हा नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काही महीने आधी आज भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पेण अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालायाला भेट देऊन ठेविदारांशी संवाद साधला. त्यामुळे पेण अर्बन बँकेच्या लाखो ठेविदार आणि खातेदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असल्याचे काही ठेविदारांनी सांगितले मात्र काही ठेविदारांनी खासदार किरीट सोमय्या यांची ही भेट म्हणजे निवडणुकी पूर्वीची वातावरण निर्मिती असल्याचे सांगितले.

बँकेच्या संचालक मंडळाने 119 जणांना कागदपत्राची पूर्तता न करताच जवळपास 734 कोटी रुपयांचे बोगस कर्ज वितरण केले होते. त्यामुळे 75 वर्षांची पंरपरा असणारी ही बँक अडचणीत सापडली. बँकेत एकूण 1 लाख 93 हजार 641 खातेदार आहेत. या ठेवीदारांच्या बँकेच्या 18 शाखांमध्ये 632 कोटी 50 लाख रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. या घोटाळ्याला जवळपास बारा वर्षे लोटली आहेत. लाखो रुपयांची रक्कम अडकलेले ठेवीदार हलाखीचे जीवन जगत आहेत. मात्र आज बारा वर्षांत ठेवीदारांना फारसा दिलासा मिळालेला नाही. ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून धरणे,उपोषण,आंदोलने आणि पाठपुरावा करून हाती काहीच लागत नसल्याने ठेवीदार व्यथित झाले आहेत.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आज पेणमध्ये पेण अर्बन बँकेच्या ठेविदारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांना सांगितले की, सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बँक ठेवीदारांच्याबाबत संबंधितांची बैठक होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. अर्बन बँकेच्या संचालकांनी बँकेची जी लूट केली आहे. त्याबाबत फास्टट्रॅक कोर्टात खटला सुरू करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. सध्या एक लाख 65 हजार ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी ही बैठक घेतली. एक महिन्यापूर्वी सहकारमंत्र्यांसोबत मंत्रालयात मीटिंग झाली होती. आनंदाची बाब म्हणजे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या अधिकाऱ्यांनी या प्रॉपर्टीची विक्री करण्यासाठी तयारी दाखविली. ठेविदारांचे पैसे मिळावेत यासाठी बँकेच्या मालमत्तेवर असणारा ताबा सोडण्यास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तयार आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बँकेने कोर्टात केलेला अर्ज मागे घेण्यात येईल.

पुढच्या आठवड्यात मी स्वतः दिल्लीला जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोलून कोर्टात जाऊन अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आपला हक्क मागे घेईल यासाठी प्रयत्न करणार. त्यामुळे काही प्रॉपर्टी विक्री करण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे. बँकेने रिझर्व बँकेला पत्र देऊन ठेविदारांचे पाच लाख व एक लाख रुपये देण्याची मागणी केली आहे परंतु पाच लाख देता येणार नाही असे विमा विभागाने (इन्शुरन्स डिपार्टमेंट) कळविले आहे. कारण 2014 नंतरचा विम्याचा हप्ता बँकेने भरलेला नाही. त्यामुळे एक लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. असे किरीट सोमय्या यांनी पेण येथील अर्बन बँकबाबत पत्रकारांना माहिती दिली. पेण अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी भेट देऊन बँकेबाबत संबंधिताबरोबर चर्चा केली. त्यांच्या भेटिकडे ठेविदारांचे लक्ष लागले होते. यावेळी काही ठेविदार आणि खातेदार यांनी आमच्या ठेवी आम्हाला व्याजासहित परत करा अशा घोषणा दिल्या.

यावेळी किरीट सोमय्या यांच्यासह पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवीशेठ पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा ठाकूर, राजेश मपारा, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, वैशाली कडू, अशोक जैन, मिलिंद पाटील, ललित पाटील, शांता भावे यांच्यासह बँकेचे खातेदार, ठेवीदार आणि भाजपचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in