भाजप खासदाराचा इंग्रजीतून प्रश्न, उत्तर देताना नारायण राणे गडबडले; अंजली दमानियांचा निशाणा; म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”

पीठासीन अधिकारी हरिवंश नारायण सिंह यांना राणे गोंधळल्याचे लक्षात येताच त्यांनी कार्तिकेय यांनी नेमका काय प्रश्न...
भाजप खासदाराचा इंग्रजीतून प्रश्न, उत्तर देताना नारायण राणे गडबडले; अंजली दमानियांचा निशाणा; म्हणाल्या, “नुसती दादागिरी…”

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सोमवारी (५ फेब्रुवारी) प्रश्नोत्तराच्या तासावेळी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी इंग्रजीतून "एमएसएमई क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत?" असा प्रश्न विचारला. राणेंना प्रश्न न कळल्याने ते गोंधळले. त्यांनी या विभागाअंतर्गत होणारी निर्यात वाढण्याबाबत उत्तर देण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहात खासदारांनी गोंधळ घातला. यावेळी राज्यसभेचे उपाध्यक्ष, पीठासीन अधिकारी हरिवंश नारायण सिंह राणे यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी राणे यांना हिंदीतून प्रश्न समजावून सांगितला. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

राज्यसभेत नेमके काय घडले?

राज्यसभेत खासदार कार्तिकेय शर्मा यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग सेक्टरमधील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने काय पावले उचलली आहेत?, असा प्रश्न इंग्रजीतून विचारला. राणे यांनी या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी एमएसएमई सेक्टरमध्ये निर्यात कशी वाढवणार? कारखाने कसे सुरू होणार याबाबतची माहिती वाचून दाखवण्यास सुरुवात केली.

ते म्हणाले, मी तुम्हाला वाचून दाखवतो, निर्यातीच्या क्षेत्रात एमएसएमईची हिस्सेदारी वाढवण्यासाठी, स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सरकारने 'मेक इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत व्यवसायाची सुगमता आणि संवर्धनासाठी प्रयत्न केले. तसेच या क्षेत्रातील उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न केले. राणेंनी दुसरेच उत्तर दिल्याने खासदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी राणे काहीसे संतापल्याचेही पाहायला मिळाले.

राज्यसभेचे उपाध्यक्ष, पीठासीन अधिकारी हरिवंश नारायण सिंह यांना राणे गोंधळल्याचे लक्षात येताच त्यांनी कार्तिकेय यांनी नेमका काय प्रश्न विचारला, हे हिंदीतून सांगितले. यावेळी गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शांत करताना "तुम्ही ऐका.. तुम्ही ऐकून घ्या", अशी विनंती नारायण राणे यांनी केली. हरिवंश नारायण सिंह राणे यांना प्रश्न हिंदीतून समजावून सांगत असताना खासदारांचा गोंधळ सुरु होता. यामुळे राणे, ''क्या... काय केलं...'' असेही कुजबुजले. तसेच, कारखाने सुरू झाले नाहीत, तर कामगारांचे प्रश्न सुटतील का? असे बोलत राहिले. राणे यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे खासदारांकडून आक्षेप घेणे सुरु होते.

यावेळी हरिवंश नारायण सिंह राणे यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी राणे यांना संबंधित खासदारांना बोलावून एमएसएमई क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार काय पावले उचलत आहे ते सांगा, असे सांगत सुरु असलेला गोंधळ मिटवण्याच प्रयत्न केला.

दरम्यान, या सर्व प्रकारावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला. राज्यसभेतला व्हिडीओ ट्विट करत राजकारणात नुसती दादागिरी आणि बॉसचा वरदहस्त फारकाळ चालत नाही, असा टोला त्यांनी राणे यांना लगावला.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

नारायण राणे यांना संसदेत प्रश्न विचारला गेला. MSME क्षेत्रात कामगार कल्याणासाठी काय पावले उचलणार हा प्रश्न होता. उत्तर काय दिले ऐका... ज्यांना प्रश्न देखील कळत नाही ते MSME ना काय दिशा व चालना देणार? असे म्हणत दमानिया यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, नुसती दादागिरी चालत नाही राजकारणात, आणि बॉसचा वरदहस्त फार काळ चालत नाही, असा खोचक टोलाही त्यांनी राणेंना लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in