“जैतापूरचा प्रकल्प होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी…” नारायण राणेंचा ठाकरेंवर निशाणा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जैतापूर प्रकल्पावरून गंभीर आरोप केला आहे.
“जैतापूरचा प्रकल्प होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी…” नारायण राणेंचा ठाकरेंवर निशाणा

कोकणातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात वादविवाद सुरु असताना आता यावरून सत्ताधारी नेते आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की, "कोकणाच्या मुळाशी उठणारे प्रकल्प आणू देणार नाही". यानंतर आता कोकणातील नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील या वादामध्ये उडी घेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, "जैतापूरमधील वीजनिर्मितीचा प्रकल्प होऊ नये, म्हणून कोळशावर उत्पादन करणारे ३४ उद्योजक उद्धव ठाकरेंना भेटले होते. हा प्रकल्प जैतापूरला होऊ देऊ नका, आम्ही तुम्हाला मदत करतो, पैसे देतो, असे उद्योजक त्यांना म्हणाले होते. मी हा मुद्दा विधानसभेतही मांडला होता.आधी ५ कोटी घेतले त्यानंतर ५०० कोटींचा व्यवहार झाला." असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, "जनता अंधारात राहिली तरी चालेल, बेकारी आली तरी चालेल, कारखाने नाही आले तरी चालेल, पण पैसा आला पाहिजे. फक्त दुसऱ्यांना खोके बोलत बसायचे. बाळासाहेबांच्या नखाचीही सर त्यांना नाही." असा टोला त्यांनी लगावला आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हल्लाबोल केला.

मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की, मी संजय राऊतांना ऐकत नाही. ऐकण्यासारखे काय असते? जनहिताचे कोणते विचार व्यक्त केले जातात? शिव्या घालणे, वेगवगेळ्या नावांनी डिवचणे. याशिवाय, दुसरे काय कार्यक्रम आहेत त्यांना? त्यांच्या मनात जे होते ते सफल केले. पवार साहेबांनी त्यांना काम दिले होते की शिवसेना संपवून दाखव. ते त्यांनी करून दाखवले. संजय राऊत महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा माणूस नाही. ते नैराश्यात जात असून त्यांचे डोके जागेवर नाही." अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in