भाजपचा सत्ता जिहाद!- उद्धव

सत्तेसाठी भाजपचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. भाजपचा सत्ता जिहाद आहे, त्यामुळे भाजपचे हिंदुत्व मी मानत नाही, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वाला सुनावले
Uddhav Thackeray
Published on

गिरीश चित्रे/मुंबई

सत्तेसाठी भाजपचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. भाजपचा सत्ता जिहाद आहे, त्यामुळे भाजपचे हिंदुत्व मी मानत नाही, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वाला सुनावले.

दरम्यान, राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद हॉलमध्ये सद्भावना व संकल्प दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, “काँग्रेस पक्ष खूप काळ सत्तेत होता. काँग्रेस सत्तेत असताना गांधी विचारांच्या काही गोष्टीत पटत नव्हत्या आणि आजही काही पटलं नाही तर नक्कीच बोलणार. लसीकरण असो लोकहिताच्या गोष्टी, राजीव गांधी यांनी कधीच आपला फोटो लावून स्वत:ची पाठ थोपटून घेतली नाही. मात्र आज स्थिती उलटी आहे, लसीकरण असो वा कुठली योजना हे स्वत:चे फोटो छापून राजकारण करताहेत.”

“राज्यात शिवसेनेची सत्ता असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. दोघांनी शपथ घेतल्यानंतर ते बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले आता राज्यात आपली सत्ता आहे, त्यामुळे काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन निदर्शने करतील, पण आंदोलनादरम्यान कोणावरही लाठी उगारायची नाही, ही आपली संस्कृती नाही. शिवसेनेमुळे भाजप सत्तेत आली आणि आता भाजप शिवसेना संपवायला निघाली आहे. अटलबिहारी वाजपेयी खूप आजारी होते. राजीव गांधी यांना ही गोष्ट कळताच त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना उपचारासाठी विदेशात पाठवले होते. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी स्वत: बोलले होते की, राजीव गांधी यांच्यामुळे मी जिवंत आहे. त्यावेळची संस्कृती आता लोप पावली आहे. त्यावेळी सीबीआय ईडीचे छापे घरी पडत नव्हते, मात्र आता विरोधात कोणी बोलले तर ईडी सीबीआय घरी पोहोचते,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला.

उद्या हाच फोटो पेपरमध्ये

मी काँग्रेस पक्षाचे, हाताचे चिन्ह असलेले उपरणे गळ्यात घातले आणि उद्या हाच फोटो पेपरमध्ये छापून येणार. मला मंचावर उपस्थित सगळेच मोलाचे आहेत, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in