भाजपच्या प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांनाच सुनावले; नेमकं काय घडलं?

शिंदे -फडणवीस सरकार असतानादेखील भाजपचे मंत्री प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड मुख्यमंत्र्यांविरोधात झाले आक्रमक
भाजपच्या प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांनाच सुनावले; नेमकं काय घडलं?

शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेकदा दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये काही आलबेल नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित केल्यापासून भाजपमधील फडणवीस समर्थक नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, विधानपरिषदेमध्ये घडलेल्या एका गोष्टीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. विधानपरिषदेमध्ये सत्ताधारी पक्षात असलेले भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातच आक्रमक झाले. शेवटी, 'तुम्ही काय विरोधक आहेत का? मुख्यमंत्र्यांना बोलू द्या.' असे म्हणत सभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजप आमदारांना खडे बोल सुनावले.

नेमकं घडलं काय?

मुंबई महापालिकेच्या कूपर-भगवती रुग्णालयातील २०० कोटींच्या घोटाळाबाबत कारवाई करण्याची मागणी आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करू असे म्हणताच प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. 'दोनशे कोटींचा हा घोटाळा आहे. माहिती कसली घेता' असा प्रश्न दरेकरांनी केला. यावेळी ते जास्तच आक्रमक झालेले पाहून सभापती निलम गोऱ्हे यांनी प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांना खडे बोल सुनावले. 'तुम्ही विरोधी पक्षात आहात का?' असा प्रश्न निलम गोऱ्हे यांनी दरेकरांना केला. "मुख्यमंत्र्यांनाही तुम्ही बोलू देत नाही. त्यांना आधी बोलू द्या." असे त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in