भाजप लागली विधानसभेच्या तयारीला; शुक्रवारच्या बैठकीत रणनीती ठरणार

लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण गांभीर्याने लढविण्याचे ठरविले असून त्यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे.
भाजप लागली विधानसभेच्या तयारीला; शुक्रवारच्या बैठकीत रणनीती ठरणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण गांभीर्याने लढविण्याचे ठरविले असून त्यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणूक तयारी आणि निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपने येत्या शुक्रवारी, १४ जूनला पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सद्य: राजकीय स्थितीवर चर्चा होऊन विधानसभा निवडणुकीची आखणी केली जाणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयशाचा सामना करावा लागला. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेत लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. मात्र, प्रत्यक्षात महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभेच्या २८ जागा लढविणाऱ्या भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा ठरल्याने भाजपने येत्या ऑक्टोबर महिन्यात होऊ घेतलेल्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक १४ जूनला मुंबईत दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई विभागीय अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी तसेच मुंबईतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in