पुण्यात राडा; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; सपकाळ यांच्या प्रतिमेला मारले जोडे; आंदोलन अन् दगडफेक, गाड्या फुटल्या, काँग्रेसही आक्रमक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानंतर संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी पुण्यातील काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन केले.
पुण्यात राडा; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; सपकाळ यांच्या प्रतिमेला मारले जोडे; आंदोलन अन् दगडफेक, गाड्या फुटल्या, काँग्रेसही आक्रमक
(Photo-X-@ani_digital)
Published on

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानंतर संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी पुण्यातील काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन केले. शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले. यावेळी भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवनामध्ये घुसण्याचाही प्रयत्न करीत होते. पण पोलिसांनी हस्तक्षेप करून तो प्रयत्न हाणून पाडला. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही काँग्रेस कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले. काँग्रेस नेते मोहन जोशी आणि प्रशांत जगताप यांनी भाजपच्या आंदोलनाचा निषेध केला आहे.

दगडफेक, बाटल्या फेकल्याचा आरोप

दरम्यान, यावेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याने दोन्ही बाजूंकडील पदाधिकारी एकमेकांसमोर आल्याने झटापट होऊन कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सुमारे तासभर हा राडा सुरू होता. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने दगड भिरकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आंदोलनावेळी दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप काँग्रेसने केला असून यामध्ये काही कारच्या काचाही फुटल्या, तसेच गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनात शिरण्याचा प्रयत्न

पुणे भाजपने दुपारी १२ वाजता काँग्रेस भवनासमोर आंदोलनाला सुरुवात केली. काही मिनिटांत भाजपचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेस भवनासमोर जमा झाले.सुरुवातीला सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करून काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा प्रचंड फौजफाटा असल्याने भाजप कार्यकर्ते आतमध्ये शिरू शकले नाहीत. यावेळी झालेल्या झटापटीत काही कार्यकर्त्यांना दुखापत झाली. जोपर्यंत धीरज घाटे आणि महापौर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही फरासखाना पोलिस ठाण्यात मांडी घालून बसणार, उठणार नाही, आमच्या माणसांची डोकी फोडली असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, त्यांनी टेम्पो भरून दगड आणले होते असा दावा देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

भाजपाच्या दंगलखोरांना अटक करा : हर्षवर्धन सपकाळ

'पुण्यातील भाजपाचे गुंड काँग्रेस कार्यालयावर चाल करुन आले, भाजपाच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा', अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यात राजकारण तापले आहे. सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करत आहेत. या अनुषंगाने पुण्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

माझ्या वक्तव्याची मोडतोड केली...

‘माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’ चा ‘मा’ करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असे मी म्हटले होते, त्याचा प्रत्यय रविवारी पुण्यात आला. पुण्यातील भाजपाचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. भाजपाच्या या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पुणे पोलिसांनी दंगलखोर भाजपा गुंडाना चिथावणी देणाऱ्या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपाच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in