ग्रामीण भागात भाजपची मुसंडी; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जिंकल्या सर्वाधिक जागा

ग्रामीण भागातील सत्ताकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे. नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने विजयी मुसंडी मारत भाजपने ग्रामीण भागात आपली पाळेमुळे रोवल्याचे सिद्ध करून दाखवले.
ग्रामीण भागात भाजपची मुसंडी
ग्रामीण भागात भाजपची मुसंडी
Published on

मुंबई : ग्रामीण भागातील सत्ताकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे. नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने विजयी मुसंडी मारत भाजपने ग्रामीण भागात आपली पाळेमुळे रोवल्याचे सिद्ध करून दाखवले. या निवडणुकीत भाजपच्या महायुतीचे घटक पक्ष असेलल्या शिवसेना शिंदे गटाला रायगड, रत्नागिरीत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुण्यात भरघोस यश मिळाले. विरोधी पक्षातील काँग्रेसला एकमेव आशा असलेल्या लातूर जिल्हा परिषदेत बहुमताने हुलकावणी दिली आहे. उर्वरित ठिकाणी विरोधी पक्षांचा धुव्वा उडाला. भाजप महायुतीच्या या अभूतपूर्व यशाने ग्रामीण भागात काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासून भाजप आणि महायुती आघाडीवर होती. या आघाडीने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर,कोल्हापूर हे बालेकिल्ले भेदले. कोकणात महायुतीने विजय मिळवून आपली तटबंदी भक्कम असल्याचे दाखवून दिले. मराठवाड्यात लातूर वगळता इतर सर्व जिल्हा परिषदांमध्ये महायुतीने आपला झेंडा फडकवला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे अधिकृत निकाल रात्री उशीरापर्यंत हाती आले नव्हेत. मात्र, उपलब्ध आकडेवारीनुसार सर्व जिल्हा परिषदांमध्ये भाजप महायुती सत्ता स्थापन करणार असे सध्याचे चित्र आहे.

सातारामध्ये भाजपने २३ जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी अजित पवार गटाला २२ तर शिवेसना शिंदे गटाला १३ जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी एकहाती लढत देत ६८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला आहे. येथे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने २० जागा जिंकल्या. भाजपला १२ तर शिंदे गटाला ९ जागा मिळाल्या आहेत. सोलापुरात ६८ पैकी ३६ जागा जिंकत भाजपने आपल्या मित्रपक्षांसह विरोधी पक्षांना धोबीपछाड दिला आहे.

मराठवाड्यातही महायुतीला यश

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव या जिल्हा परिषदेत महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे २३ अधिक पुरस्कृत २ असे एकूण २५ उमेदवार निवडून आले आहेत. येथे शिवसेना शिंदे गटाला २१ जागा मिळाल्या आहेत. परभणीत ५४ पैकी २४ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. येथे शिवसेना ठाकरे गटाला अवघ्या ६ जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने १५ जागांवर यश मिळवले आहे. धाराशिवमध्ये ५५ पैकी भाजपला १९, शिवसेना शिंदे गटाला १५ तर उद्धव ठाकरे गटाला ७ जागा मिळाल्या आहेत. लातूरमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. येथे ५९ पैकी २३ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. त्यापाठोपाठ भाजपला १८ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला १२ जागांवर विजय मिळाला आहे.

पुणे जिपवर अजित पवार गटाचे वर्चस्व

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची 'मिडल पावडर' समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा अभेद्य राखला आहे. सोमवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ७३ पैकी बहुतांश जागांचे निकाल हाती आले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ४८ जागांवर आघाडी मिळवत बहुमताचा ३७ हा आकडा सहज पार करत जिल्हा परिषदेवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. भाजपला १० जागा, शिवसेना (एकनाथ शिंदे) ४, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ६, राष्ट्रवादी (शरद पवार) १ तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही.

मावळात सत्तांतर; शेळकेंनी उडवला भाजपचा धुव्वा

या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का मावळ तालुक्यात बसला आहे. गेल्या २५ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला मावळचा गड राष्ट्रवादीने पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मावळमधील ५ जिल्हा परिषद आणि १० पंचायत समिती अशा सर्व १५ जागांवर दणदणीत विजय मिळवत भाजपचा सुपडा साफ केला. माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्रातील जनतेचा भक्कम जनादेश - पंतप्रधान

पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे. महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला आहे. ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे युतीचे सरकार हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींचे आभार मानतो. ​महाराष्ट्र सरकारच्या ठोस कामगिरीबद्दल तसेच एनडीएच्या सुशासनाच्या दृष्टिकोनाबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवत, स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.

कोकणात महायुतीचा झंझावात

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झंझावात दिसला. यापैकी रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ पैकी जवळपास ५२ जागांवर महायुतीला विजय मिळाला आहे. येथे शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिंदे गटाला २१, भाजपला १५ तर राष्ट्रवादी काँग्रेसला १६ जागा मिळाल्या आहेत. रत्नगिरीत ५६ पैकी ४० जागांवर शिवसेना शिंदे गट विजयी झाला आहे. येथे शिंदे गट स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे पिता-पुत्रांनी आपले वर्चस्व दाखवून दिले. येथे भाजपला २७, तर शिंदे गटाला १४ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले.

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचा झेंडा

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा,सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या. या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकला. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ६१ पैकी १८ जागा राखत पक्षाचे अस्तित्व दाखवून दिले. त्याखालोखाल काँग्रेसला ११ जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या

अकाली मृत्यूने पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या बाजूने सहानुभूती दिसून आली. येथे राष्ट्रवादी अजितदादा गटाने ७३ पैकी ४८ जागा खिशात घातल्या आहेत.

जिल्हा परिषद निवडणूक निकाल

  • १२ जिल्हा परिषदा

एकूण जागा ७३१

  • भाजप : २२५

  • राष्ट्रवादी अजित पवार : १६५

  • शिवसेना शिंदे गट : १६२

  • काँग्रेस : ५५

  • शिवसेना ठाकरे गट : ४३

  • राष्ट्रवादी शरद पवार : २६

  • मनसे : ०२

  • अपक्ष : २०

  • इतर : २१

  • पं. समिती

एकूण जागा - १४६२

  • भाजप - ४५९

  • राष्ट्रवादी - ३०६

  • शिवसेना ३०२

  • काँग्रेस ९७

  • उबाठा - ८९

  • शरद पवार - ४६

  • मनसे - २

logo
marathi.freepressjournal.in