सिंधुदुर्गात फोडाफोडीचे राजकारण; भाजपचा शिंदे सेनेवर थेट हल्लाबोल!

जिल्ह्यात भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुतीतील ताण वाढण्याची चिन्हं आहेत. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांना शिंदे सेनेत प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून हा वाद उफाळून आला आहे.
सिंधुदुर्गात फोडाफोडीचे राजकारण; भाजपचा शिंदे सेनेवर थेट हल्लाबोल!
Published on

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुतीतील ताण वाढण्याची चिन्हं आहेत. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांना शिंदे सेनेत प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून हा वाद उफाळून आला आहे.

मालवण शहरअध्यक्ष बाबा मोंडकर यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्यावर गंभीर आरोप करत, “मित्रपक्ष असूनही आमच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा थेट आरोप केला. त्यांनी याला “महायुतीतील मिठाचा खडा टाकण्याचे काम” असे संबोधून "जशास तसे उत्तर दिले जाईल" असा इशाराही दिला.

या पत्रकार परिषदेच्या पाठोपाठ भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधल्याचे सांगितले. गेल्या काही महिन्यांपूर्वी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत दत्ता सामंत यांनी जोरदार पक्षप्रवेश मोहीम राबवली होती. रोज नवनवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश होत होता. मात्र त्यावेळीही भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवत हा प्रकार थांबवण्याची मागणी केली होती, आणि काही काळ ती मोहीम स्थगित झाली होती.

मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पक्षप्रवेशाचे राजकारण सुरू झाले आहे. विशेषतः खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांना शिंदे सेनेत सामील करून घेण्याच्या हालचालींमुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली किनारपट्टी भागात सुरू असलेली विकासकामे आणि भाजपचा जनाधार लक्षात घेता, सामंत जानपदात गोंधळ निर्माण करत आहेत, असा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शिंदे सेनेकडून या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही. मात्र भाजपच्या तीव्र भूमिकेमुळे महायुतीतील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

logo
marathi.freepressjournal.in