

मुंबई/प्रतिनिधी
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपांचे सत्र शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील वाक्युद्धामुळे भाजप आणि शिंदे गट यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निलेश राणे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेऊन नवनाथ बन यांना लक्ष्य केले. ‘तुझा जीव एवढा आणि तू बोलतो केवढा’, अशा शब्दांत राणे यांनी बन यांचा एकेरी उल्लेख केला. शिंदेंवर बोलण्याचा अधिकार नवनाथ बन यांना नाही. आम्ही कधीही भाजपच्या नेत्याला कुठल्याही निवडणुकीतील पराभवाला जबाबदार ठरवलेले नाही. शिंदेंची मूकसंमती आहे का, हे तू कोण विचारणारा? तू जे बोलतोय त्याला कुणाची संमती आहे? असे सवाल उपस्थित करत नको त्या वाटेला जाऊ नको, असा इशाराही त्यांनी दिला.
शिंदे गटाचे पुणे शहरातील नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर बन यांनी टीकास्त्र सोडले. ज्यांनी बारा पक्ष फिरून शिंदेसेनेत प्रवेश केलाय, असा माकडछाप व्यक्ती अतिशय खालच्या शब्दात भाजप, फडणवीस आणि माझ्यावर टीका करतोय. या माकडछाप ब्रॅण्डला पुणेकरांनी घरी बसवले. माकडाच्या हाती कोलीत अशी अवस्था त्यांची आहे, अशाने भाजपला शहाणपणा शिकवू नये, असे बन यांनी बजावले. या टीकेला धंगेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बन हा ‘पगारी प्रवक्ता’ आहे. त्याचा आणि भाजपचा काही संबंध आहे का? भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता बोलला असता तर मला फरक पडला असता,असा टोला त्यांनी लगावला.
दोस्तीत कुस्ती नको...
दरम्यान, महायुतीतील मित्र पक्षांच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी आमच्या नेत्यांवर आरोप करणे टाळावे, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले आहे. भाजप प्रवक्त्यांची भाषा अयोग्य होती, त्यांनी भाषेची मर्यादा पाळायला हवी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना मित्र पक्षांवर टीका करू नये. दोस्तीत कुस्ती नको, असे आदेश दिल्याचे परांजपे यांनी सांगितले.
बन यांच्याशी मैत्री नाही - निलेश राणे
नवनाथ बन यांच्याशी मैत्री असल्याचा दावा फेटाळताना निलेश राणे म्हणाले, तो माझा मित्र नाही. मी जेव्हा खासदार झालो, तेव्हा तो शाळेत होता. मी ऐऱ्यागैऱ्यांना मित्र बनवत नसतो. त्यामुळे बन याने आम्हाला शिकवू नये कसे काम करायचे ते. आम्ही याच्या नेत्याला उत्तर देऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर देऊ, तू कोण आहेस?
शिंदेंबद्दल चुकीचे बोललो नाही - नवनाथ बन
नवनाथ बन यांनी निलेश राणे यांच्याशी आपले जवळचे संबंध असल्याचे सांगत या वादावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मी एकनाथ शिंदेंबद्दल कुठेही चुकीचे बोललो नाही. मी फक्त शिंदेंना एवढेच विचारले की धंगेकर, सत्तार जे बोलतात ती भूमिका शिंदेंची आहे का? या प्रश्नाचे अत्यंत साधे, सरळ, सोपे उत्तर अपेक्षित आहे. मी निलेश राणेंवर टीका करणार नाही.
ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात
या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणावर भाष्य केले. राजकारणात काहीही घडते हे महाराष्ट्राने बघितले आहे. विरोधी टोकाचे विचार असलेल्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशे काम केले आहे. त्यामुळे ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात. शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत काम करण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा आहे, तीच इच्छा एकनाथ शिंदेंची आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे, असे धंगेकर म्हणाले.