
मुख्यमंत्री पदाची माळ जरी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली असली तरी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरुन निर्माण झालेला संघर्ष आजही कायम आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा संभाळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चोहोबाजूंनी कोंडी करण्याची एकही संधी दवडलेली नाही. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने राज्यातील मतदार संघात सर्वेक्षण सुरु केले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने ही जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
जुलै २०२२ पासून एकत्र संसार करणाऱ्या भाजप शिवसेनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपल्या पद्धतीने मतदार संघात बांधणी करण्याचा अधिकार आहे, असे सांगत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यावर अधिक भाष्य करणे टाळले.
जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःची शिवसेना स्थापन केली. त्यानंतर शिवसेना आणि भाजप एकत्र आले आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली. जवळपास अडीच वर्षें एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यात काम केले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना जनतेची पसंती मिळत गेली आणि शिंदे भाजपला डोईजड होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने एकनाथ शिंदे यांना कुरवाळत ठेवले.
लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने एक प्रकारे नाकारले. मात्र विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला पसंती दिली आणि महायुतीच्या सर्वाधिक २३० जागा निवडून आल्या. २३० पैकी १३५ जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष भाजपला घवघवीत यश मिळाल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास बळावला. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे मोर्चा वळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी प्रत्येक पक्षाने आपल्या पद्धतीने मतदार संघात चाचपणी सुरू केली आहे.
...म्हणून शिंदेंची ताकद कमी होत नाही
भाजप नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जनता दरबाराची सुरुवात केली आहे. ठाण्यात जनता दरबार घेतल्याने एकनाथ शिंदे यांची ताकद कमी होते, असे काही नाही. मुख्यमंत्री पदावर असल्यापासून शिंदे जनतेच्या मनात कायम असून पुढेही एकनाथ शिंदे जनतेचे नेते म्हणून कायम असतील. त्यामुळे ठाण्यात कोणी जनता दरबार घेतला तर शिंदेंची ताकद कमी होईल असे काही नाही. नवी मुंबईत मीही जनता दरबार घेणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
जो पक्ष लोकशाहीत स्थापन झाला त्या पक्षाला स्वतःचे अस्तित्व तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे भाजपने सर्वेक्षण सुरु केले यात काही वावगे नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनेही स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा पातळीवर चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे लोकशाहीतील प्रत्येक पक्षाला आपले अस्तित्व तपासण्याचा अधिकार आहे.
- उदय सामंत, शिवसेना नेते