भाजपला घरफोडीचे लायसन्स द्या! पक्षचिन्ह कमळऐवजी हातोडा द्या, उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

शिवसेना हा एक निखारा आहे. ही शिवसेना कळणे येड्यागबाळ्याचे काम नाही. भाजपला आता घरफोडीचे लायसन्स दिले पाहिजे आणि पक्षचिन्हदेखील कमळऐवजी हातोडा दिला पाहिजे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.
भाजपला घरफोडीचे लायसन्स द्या! पक्षचिन्ह कमळऐवजी हातोडा द्या, उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

इंडिया आघाडीच्या सभेत रविवारी शिवाजी पार्कवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदू बांधवांनो म्हणण्याऐवजी माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो, अशी भाषणाची सुरुवात केली. यावरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्याला हिंगोली येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शिवसेना हा एक निखारा आहे. ही शिवसेना कळणे येड्यागबाळ्याचे काम नाही. भाजपला आता घरफोडीचे लायसन्स दिले पाहिजे आणि पक्षचिन्हदेखील कमळऐवजी हातोडा दिला पाहिजे, अशा शब्दांत हल्लाबोल केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी आयोजित सभेत त्यांनी भाजप आणि शिंदे गट शिवसेनेला लक्ष्य केले. ते म्हणाले की, शिवसेनेचे प्रेम आणि मिध्यांचे भाडोत्री प्रेम यात जमीनअस्मानचा फरक आहे. काल इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत मी माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या देशप्रेमी, देशभक्त बांधवांनो, अशी सुरुवात केली. त्यावेळी मोदीभक्तांनी टीका केली. मग तुम्ही काय देशभक्त नाही काय, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा होत आहेत. या सभांमधून भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे आगामी काळात यापेक्षा जास्त टीका होण्याची शक्यता आहे. यावेळी ठाकरे यांनी ‘अच्छे दिन नाही तर आता सच्चे दिन येणार आहेत’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढविताना कालच्या भाषणाचा संदर्भ देत आयुष्यभर हिंदुत्ववादाची भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळसाहेब ठाकरे यांच्या पुत्राला तमाम हिंदू बांधवांनो, असे म्हणायला लाज वाटते का, सोनिया गांधी यांच्यासाठी किती लाचारी पत्करणार, असा सवाल उपस्थित केला.

काँग्रेसच्या हातात दिली उबाठाची ‘मशाल’ - शेलार

आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन... आपल्याला हवे तेवढे... शिवतीर्थावर भाषण करणारे श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा "न्याय" मिळाला ? काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची ‘मशाल’. आता खंजीर, वाघ, मर्द..कोथळा.. अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!! अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in