नागपूर : नागपूरमध्ये रविवारी मध्यरात्री भरधाव ऑडीने दोन कार व एका दुचाकीला धडक दिली. या अपघाताला आता राजकीय वळण लागले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी दोन्ही बाजूकडून झडू लागल्या आहेत. धडक देणारी ऑडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत याची असल्याचे उघड झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
नागपूरच्या रामदासपेठ भागात हा अपघात झाला. त्यात बावनकुळे यांच्या पुत्राचा थेट सहभाग असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केली आहे.
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भरधाव ऑडीने सर्वात पहिल्यांदा दुचाकीला धडक दिली. यात दोघे जण जखमी झाले. त्यानंतर जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला रात्री १ वाजता धडक दिली. या ऑडीने मानकपूर विभागातील टी पॉईंटवर पोलो कारला धडक दिली. या अपघातानंतर संकेत बावनकुळेसह तिघेजण पळून गेल्याचे बोलले जात आहे. सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी ऑडी चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
चौकशी करून दोषींवर कारवाई करावी -बावनकुळे
पोलिसांनी प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून संपूर्ण चौकशी करावी. या प्रकरणी कोणालाही वेगळा न्याय देता कामा नये. किंबहुना, जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय का? - अंधारे
अपघाताच्या वेळी या गाडीमध्ये संकेत बावनकुळे होता. मात्र, अपघाताच्या वेळी पोलिसांनी गाडी नंबर नोंद करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे या प्रकरणात वेगळा न्याय का दिला? गाडी आणि संबंधित लोकांना पोलिसांनी ताब्यात का घेतले नाही? एका नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय आणि सर्व सामान्यांना वेगळा न्याय का? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.