सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपचा ‘राज’मार्ग

भाजपला महाराष्ट्रातील ४५ जागांचे लक्ष्य गाठायचे आहे. मनसेला सोबत घेतल्यास मनसेची एकगठ्ठा मते महायुतीच्या उमेदवाराला मिळू शकतात. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरी भागात मनसेला मानणारा मोठा मतदार आहे.
सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपचा ‘राज’मार्ग

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील उपस्थित होते. राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट ही मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत. विशेष म्हणजे मनसेला दोन जागा सोडण्याचा विचार भाजप करत आहे. महाराष्ट्रात अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपने हा ‘राज’मार्ग पत्करल्याचे बोलले जात आहे.

यात प्रामुख्याने दक्षिण मुंबईच्या जागेचा समावेश आहे. दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकर हे महायुतीचे उमेदवार असू शकतात. मनसेला राजकीय इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेची दारे किलकिली होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी कंबर कसली आहे. ‘अब की बार, चारसौ पार’ असा नारा भाजपने दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत चारशे पारचे लक्ष्य गाठणारच, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने एक-एक जागा जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. अद्यापही इतर पक्षांतील बड्या नेत्यांचे प्रवेश भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुरू आहेत. आता मनसेलाही सोबत घेण्याची तयारी महायुतीने सुरू केली आहे. दिल्लीतील भेट ही त्या दिशेनेच टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

‘राज’कारणासाठी तावडेंची महत्त्वाची भूमिका

सोमवारी संध्याकाळी राज ठाकरे विशेष विमानाने दिल्लीत पोहोचले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. नंतर राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली.

पण गेल्या काही वर्षांत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधातील भूमिका सौम्य करत प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून त्यांनी जोरदार आंदोलन केले होते. राज्यात जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड करत सत्तांतर केले तेव्हा मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने विधानसभेत मतदान केले होते.

भाजपला महाराष्ट्रातील ४५ जागांचे लक्ष्य गाठायचे आहे. मनसेला सोबत घेतल्यास मनसेची एकगठ्ठा मते महायुतीच्या उमेदवाराला मिळू शकतात. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरी भागात मनसेला मानणारा मोठा मतदार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत सामील होण्यासाठी मनसेने दोन जागा मागितल्याचे सूत्रांकडून समजते. त्यातील एक जागा ही दक्षिण मुंबईची आहे. या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार हे‍ निश्चित आहे.

भाजपची ‘ठाकरे’ नावातील वलयासाठी धडपड

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षांना फोडून भाजपने तीन पक्षांची महायुती केली. पण महाराष्ट्रात ‘ठाकरे’ नावाला असलेले जादुई वलय भाजपच्या घोडदौडीला लगाम घालू शकते. याची भीती भाजपला सतावत आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन ‘ठाकरे’ नावाचे वलय वापरण्याची धडपड भाजप करीत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या झंझावातामुळेच भाजपला महाराष्ट्रात यापूर्वी पाय रोवता आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in