भाजपचा जन्म २०१४ नंतर…चा; राम मंदिराच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

केंद्राकडून प्रमुख पाहुण्यांना निमंत्रणे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. पण ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी बाबरी पाडली
भाजपचा जन्म २०१४ नंतर…चा; राम मंदिराच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
PM

मुंबई : काही दिवसांतच आता अयोध्येतील राम मंदिराचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्राकडून प्रमुख पाहुण्यांना निमंत्रणे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. पण ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी बाबरी पाडली, त्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. ज्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप रणछोडदास असून त्यांचा जन्म हा २०१४ नंतर झाल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे.

२०१४ नंतर देश निर्माण झाला म्हणाणारे स्वत:ला रामापेक्षा मोठे मानतात का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. “इतिहास आणि भाजपचा अजिबात संबंध नाही. कारण इतिहास घडविण्यामध्ये त्यांचा कुठेही हात नाही. मुंबई लढा, महाराष्ट्र लढा, स्वातंत्र्यासाठीचा लढा इतकेच काय तर अयोध्येच्या लढ्यातही यांचा सहभाग नव्हता. त्यामुळे त्यांना त्याविषयी पोटदुखी आहे. हे लोक भगतसिंह, पंडित नेहरू, महात्मा गांधी घडवू शकले नाहीत. हे काहीच घडवू शकले नाहीत. मुळात यांचा देश २०१४ नंतर निर्माण झाला आहे, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपा सुद्धा २०१४ नंतर निर्माण झाला आहे,” असा टोला राऊतांनी लगावला आहे.

“अयोध्या आंदोलन हे २०१४ आधीचे आहे. हे रणछोडदास आहेत, जे पळपुटे आहेत. शिवसेना अयोध्येच्या आंदोलनात कुठे होती, हे भाजपने पाहिले पाहिजे. त्यांनी भाजपचाच इतिहास पाहिला पाहिजे. भाजपचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांचे त्यावेळचे वक्तव्य आहे की, बाबरी पाडण्याचे कृत्य शिवसैनिकांनी केले असून भाजपने केलेले नाही. लालकृष्ण अडवाणीही म्हणाले होते की, बाबरी पाडणे हे भाजपचे काम नाही. मग कोणी केलं? आकाशातून मारेकरी आले होते का? ते शिवसैनिक होते,” अशी टीका राऊतांनी केली आहे.

 बाबरी पाडण्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली

“बाबरी पाडणारे शिवसैनिक होते. बाळासाहेब ठाकरेंनी बाबरी पाडण्याची जबाबदारी घेतली. ते पळून गेले नाही. यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये. २०१४ नंतर जन्माला आलेली ही बालकं आहेत. त्यांना आधीचा भारत, आधीचा संघर्ष माहिती नाही. यांचं कामच आहे लोकांनी बनवलेली लोणची-पापड विकायचे,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in