

दीपक भिसे/जव्हार
जव्हार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडली. त्यानंतर या लोकशाहीच्या उत्सवात भारतीय जनता पक्षाने (भाजप) जव्हार नगरपरिषदेवर आपले कमळ फुलवले. नगराध्यक्ष पूजा कुणाल उदावंत यांच्यासह २० पैकी १४ नगरसेवक निवडून आले आणि एकहाती सत्ता मिळवली.
या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता खुल्या प्रवर्गातील महिला हे पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यानुसार, भाजपच्या उमेदवार पूजा कुणाल उदावंत यांना ३८६५ मते मिळाली, ज्यामुळे त्या नगराध्यक्षपदी १६५३ मतांनी विजयी झाल्या. दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीच्या रश्मीन मणियार यांना २२१२ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) युतीतून उभ्या राहिलेल्या पद्मा रजपूत यांना १४७९ मते मिळाली.
नितीन बोंबाडे/पालघर
पालघर जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून जव्हार नगरपरिषद आणि वाडा नगरपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे. तर पालघर आणि डहाणू नगरपरिषदांवर शिवसेना (शिंदे गट)ने विजय मिळवला आहे. पालघर व डहाणू येथे भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. या निकालांमुळे जिल्ह्यात महायुतीचाच वरचष्मा स्पष्टपणे दिसून आला आहे.
जव्हार नगरपरिषदेत भाजपच्या पूजा उदावंत, पालघर नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट)चे उत्तम घरत, वाडा नगरपंचायतीत भाजपच्या रीमा गंधे तर डहाणू नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट)चे राजेंद्र माच्छी नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत.
जव्हार नगरपरिषदेच्या एकूण २० जागांपैकी भाजपने १४ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिवसेना (शिंदे गट)ला २, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला ३ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला १ जागा मिळाली आहे.
डहाणूत भाजपला बहुमत मात्र नगराध्यक्ष शिंदे गटाकडे
डहाणू नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट)चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत यांचा ४,०५५ मतांनी पराभव केला. त्यामुळे डहाणूतील नगराध्यक्षपद शिवसेना (शिंदे गट)कडे गेले आहे. डहाणू नगरपरिषदेच्या एकूण २७ जागांपैकी भाजपने १७ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. शिवसेना (शिंदे गट)ला २ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला ८ जागा मिळाल्या आहेत.