लोणावळा : नरेंद्र मोदी व भाजप लोकशाहीला संपवण्यासाठी बसले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा सत्तेत आले तर अनेकांना जेलमध्ये जावे लागले. कारण ते लोकशाही, संविधान काहीच मानत नाहीत. आता आपल्यासमोर करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर भाजपा व नरेंद्र मोदी सातत्याने टीका करत असतात त्यामागे गांधी-नेहरूंची विचारधारा संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे कॉँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी टिकास्त्र सोडले.
लोणावळ्यातील दोन दिवसांच्या राज्यस्तरीय शिबिरात समारोपाचे मार्गदर्शन करताना चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी फार कमी वेळ राहिला आहे. आता निवडणुका सायंटिफिक पद्धतीने लढवल्या पाहिजेत यावर चर्चा झाली आहे. बुथ मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचे आहे. इंडिया आघाडीला सत्तेत आणण्यासाठी काम केले पाहिजे आणि राज्यातून ४८ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवा. तसेच पक्षात शिस्त असली पाहिजे. कोणी काहीही बोलावे हे चालणार नाही. एनएसयूआय, युवक काँग्रेस, फ्रंटल सेल त्यांच्याही प्रदेश स्तरावर बैठका झाल्या पाहिजेत.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, लोणावळ्यात दोन दिवसांच्या शिबिरातून चांगले बौद्धीक व वैचारिक मंथन झालेले आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगून काम करा. काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यात एकजूट असला पाहिजे. सर्व सेल, फ्रंटल संघटना सर्वांनी सोबत असले पाहिजे. पक्षाच्या अजेंड्यावरच सर्वांनी काम केले पाहिजे व काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या अजेंड्यानुसारच काम करा आणि लोकसभेची लढाई जिंकायची आहे हा संकल्प घेऊनच जा. आता आपल्याकडे वेळ नाही, युद्धपातळीवर काम करायचे आहे. भाजपा कसे खोटे बोलत आहे, जनतेची फसवणूक करत आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, कुठेही कमी पडू नका. आघाडीला विजयी करून भाजपचा पराभव करावा लागणार आहे. वातावरण काँग्रेस व मविआच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करू शकतो हे लक्षात घ्या, असे सांगत शेवटी नाना पटोलेंनी भाषण संपवले.
पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, संजय राठोड, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, एनएययुआचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख आदी उपस्थित होते.