भाजपचे पुण्यात ‘घर चलो’ अभियान; महापालिका निवडणुकीची तयारी सुरू

आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या भारतीय जनता पक्षाने शहरातील प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, येत्या पाच जानेवारी रोजी ‘घर चलो’अभियान राबविले जाणार आहे.
भाजपचे पुण्यात ‘घर चलो’ अभियान; महापालिका निवडणुकीची तयारी सुरू
Published on

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या भारतीय जनता पक्षाने शहरातील प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित केले असून, येत्या पाच जानेवारी रोजी ‘घर चलो’अभियान राबविले जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि पक्ष म्हणून भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, त्यावर संतुष्ट न राहता भाजपने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपने सदस्यनोंदणी मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱयांची कार्यशाळा झाली. त्या वेळी प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणी करण्याचे निश्चित करण्यात आले. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, राघवेंद्र मानकर, प्रमोद कोंढरे, महेश पुंडे, राजेंद्र शिळीमकर या वेळी उपस्थित होते.

शहर सदस्यता अभियानप्रमुख राघवेंद्र मानकर यांनी प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांसमोर ठेवले. तसेच ५ जानेवारी रोजी ‘घर चलो' अभियान राबविण्यात येणार असून, नागरिकांना सदस्य करून घेण्याची सूचना त्यांनी केली. पीयूष कश्यप यांनी सदस्यता नोंदणीसंदर्भात सर्व तांत्रिक गोष्टींची माहिती कार्यकर्त्यांना दिली. सदस्य नोंदणीसाठी ८८००००२०२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही कश्यप यांनी केले आहे.

शहरातील सदस्य नोंदणीची संख्या राज्यात सर्वाधिक पाहिजे, असे आवाहन प्रभारी जगदीश मुळीक यांनी केले. दर सहा वर्षांनी सदस्यता अभियान होते. पुणे शहरात विधानसभेला पडलेल्या मतांपेक्षा जास्त नोंदणी झाली पाहिजे, अशी सूचना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.

‘प्रत्येक मतदारसंघात लाखभर नोंदणी व्हावी’

सक्रिय सदस्य होण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कमीत कमी ५०सदस्य नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून ८० हजार ते एक लाख नोंदणी झाली पाहिजे, असेही आवाहन महाडिक यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in