मुंबई : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाल्याच्या बातम्या खऱ्या आहेत तर मग केंद्रातील भाजप सरकार बांगलादेशच्या क्रिकेट संघासाठी पायघड्या का घालतंय?, बांगलादेशच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्यामागे केंद्र सरकारवर कोणाचा दबाव?, भाजपचं हिंदुत्व हे निवडणुकीसाठी असतं, असा जोरदार हल्लाबोल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केला.
बांगलादेशात गेल्या दोन महिन्यांपासून हिंदूंवर अत्याचार सुरू असल्याच्या बातम्या काही माध्यम व सोशल मीडियावर सुरू असून त्या बातम्या खऱ्या आहेत का?, बातम्या खऱ्या असतील, तर त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकारवर कोणाचा दबाव आहे? असा सवाल आदित्य यांनी केला. जर या बातम्या खोट्या असतील, तर सोशल मिडियातून आणि माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या या बातम्या (बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार!) हा भाजपने भारतातल्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला 'जुमला' तर नाही ना? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टता जाणून घेण्यास आपण उत्सुक असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. भाजपचं हिंदुत्व गेलं कुठे?, भाजपचं हिंदुत्व निवडणुकीसाठी असा टोला आदित्य ठाकरे यांनी एक्सवर ट्विट करत लगावला.
‘राज्यात गृहमंत्री आहे का?’
बदलापूरातील घटनेनंतरही राज्यात महिलांवरील अत्याचाराचे सत्र सुरू आहे. पुण्यात गोळीबार, नागपूरमध्ये ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला. त्यामुळे राज्याला गृहमंत्री आहे की नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
‘...पण राज्यात इलेक्शन नाही’
‘वन नेशन वन इलेक्शन’ या कायद्याला केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. हरियाणा, जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर केल्या, त्यावेळी महाराष्ट्र, झारखंडच्या निवडणुका जाहीर का केल्या नाहीत. मुंबई महापालिकेसह राज्यातील महानगर पालिका, नगर पालिकेच्या निवडणुका दोन तीन वर्षांपासून घेतलेल्या नाहीत. ‘वन नेशन वन इलेक्शन’ची भाषा करणाऱ्या भाजप सरकारला महाराष्ट्र, झारखंडमध्ये निवडणुका घेण्याची हिम्मत नाही. निवडणूक आयोग हा भाजप कार्यालयातून चालवला जातो, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.