
मुंबई : निवडणुका जवळ आल्या की, भाजपला हिंदुत्वाची आठवण होते. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तेथील मंदिरे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. तरीही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का? भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे हिंदुत्व गेले कुठे? निवडणुका जवळ आल्या की, मतांसाठी भाजपला हिंदुत्व आठवते, अशा तिखट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्वावर भाजपची भूमिका काय ते आधी स्पष्ट करावे, असे खुले आव्हानही ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
बांगलादेशातील गोरगरीब हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुंबईत दादरमधील ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वे प्रशासन पाडायला निघाले आहे, आता भाजपचे हिंदुत्व कुठे गेले? हिंदूंच्या मतांवर निवडून आले तर मंदिरे वाचवण्यासाठी काय करणार, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
बांगलादेशात इस्कॉन मंदिर जाळले, मात्र भाजप गप्प. संसदेचे अधिवेशन सुरू असून हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोधक जाब विचारताहेत. केंद्रातील सत्ताधारी विरोधकांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे देत नाहीत. त्यामुळे आता भाजपची हिंदुत्वाची व्याख्या नेमकी काय आहे. तुमचे हिंदुत्व फक्त निवडणुकीत मतांसाठी आहे का? मतांसाठी मतदारांना भयभीत करतात. ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा घोषणा देतात. परंतु ज्या ठिकाणी काहीच नाही, त्या ठिकाणी या घोषणा दिल्या जात आहेत. फोनवर युक्रेनचे युद्ध थांबले म्हणता तर बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्याची धमक दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मोदींना दिले.
जगभरात फिरायला वेळ,पण खासदारांसाठी नाही!
संसदेत योग्य उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. परंतु ती नाकारली गेली. त्यामुळे मी खासदारांना सांगितले पंतप्रधानांना पत्र द्या. त्यांच्या मागे खूप व्याप आहे. जगभरात फिरायला त्यांना वेळ आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.
आधी हिंदुत्व नंतर ‘वन नेशन, वन इलेक्शन’
केंद्रीय संसदीय अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ बिल मंजूर झाले. हिंदुत्व फक्त मतांसाठी, घाबरवायचे आणि मते घ्यायची, पण मंदिरे कुठे सेफ आहेत. र्इव्हीएम मशीनद्वारे निवडणूक जिंकली. जगातील हिंदू मोदींकडे अपेक्षेने बघताहेत. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा स्पष्ट करा. त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार, असेही ते म्हणाले.
फोडाफोडीत मंत्रिमंडळ विस्तार लटकला
मुख्यमंत्री कोण? यावर आधी महायुतीत धुसफूस सुरू होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाचा वाद मिटला तर आता मंत्रिमंडळात कोण? यावर महायुतीत एकमत नाही. त्यात भाजपला आणखी आमदार मिळाले की एकहाती सत्ता स्थापन करणे शक्य होईल. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणात मंत्रिमंडळ विस्तार लटकला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मोदींबद्दल बोलण्याची तुमची लायकी नाही - बावनकुळे
ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचे हिंदूप्रेम किती बेगडी होते हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेने बघितले. पालघरमध्ये झालेले साधूंचे हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्राने बघितली. यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते. त्यामुळे तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच, पण तुमची ती लायकीदेखील नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.