
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यात मोठी ताकद आहे. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. श्रीकांत शिंदे हे या मतदार संघातून मोठ्या मताधिक्यानं लोकसभेवर निवडून गेले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघातील जागेवरुन भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वाद सुरु आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते सांगतील तो उमेदवार मान्य केला जाईल. दुसरा कोणताही उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भुमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. यावरुन विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र यावर आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
या विषयी बोलताना बावनकुळे म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत. त्यांना तेथून कोणीही हलवू शकणार नाही. भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला पूर्ण पाठिंबा देतील. माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबातची प्रतिक्रिया दिली आहे.
मागील काही दिवसांपासून कल्याण लोकसभेच्या जागेचा वाद सुरु होता. आज चंद्रकांत बावनकुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण देऊन या वादवर पडदा टाकला आहे. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेतून निवडून आले असून त्यांना तेथून कोणीही हलवू शकत नाही. डोंबिवलीतील भाजपचे बुथप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला पूर्ण पाठिंबा देणार आहेत. तसंच मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जास्त मतांनी त्यांना निवडून आणू, त्यांची खूप क्षमता आहे. ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. भाजपा त्यांना तेवढ्याच ताकदीने मदत करेल. असं देखील बावनकुळे म्हणाले आहेत.