अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपचे मिशन बारामती यशस्वी; अजित पवार यांची काटेवाडीच्या वारसा हक्काची लढाई सोपी

Maharashtra Assembly Elections Results 2024: विधानसभेच्या या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती-इंदापूर, शिरूर-आंबेगाव, भोर, मावळ ते पिंपरी, हडपसर हा पुण्याचा गड मजबूत करतानाच नाशिक, अहमदनगर जिल्हा तसेच कोकणातील श्रीवर्धन, चिपळूण काबिज केले.
 अजित पवार
अजित पवार
Published on

मुंबई : विधानसभेच्या या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती-इंदापूर, शिरूर-आंबेगाव, भोर, मावळ ते पिंपरी, हडपसर हा पुण्याचा गड मजबूत करतानाच नाशिक, अहमदनगर जिल्हा तसेच कोकणातील श्रीवर्धन, चिपळूण काबिज केले. मराठवाड्यात शरद पवारांचे प्रभावक्षेत्र समजल्या जाणाऱ्या बीड आणि परभणी भागातही अजितदादांचे शिलेदार निवडून आणत विदर्भातही चांगली कामगिरी केल्याने भाजपचे मिशन बारामती एका अर्थाने यशस्वी झाल्याचे मानता येईल.

अजितदादांच्या घोड्यावर बसून त्यांना मुबलक दारुगोळा पुरवित भाजपने आपले मिशन साध्य केल्याने शरद पवार यांचा राजकीय प्रभाव त्यांच्या उत्तर आयुष्यात तरी झाकोळून टाकण्यात भाजपचे धुरंधर यशस्वी ठरले. यातून काटेवाडीतल्या राजकीय वारसाच्या लढाईत सध्या तरी अजितदादांची सरशी झाली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीच्या जागावाटपात ५८ जागा मिळाल्या होत्या. रात्री नऊ वाजेपर्यंतच्या अधिकृत निकालानुसार पवार यांच्या गटाने ३८ जागा जिंकल्या होत्या, तर तीन जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर होते.

अजित पवार हे बारामतीमधून एक लाख ८९९ मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. तर कोपरगावमधून आशुतोष काळे हे एक लाख २४३ हजार ६२४ मताधिक्याने, परळीतून धनंजय मुंडे हे एक लाख ४० हजार २२४ इतक्या मताधिक्याने, इगतपुरीतून हिरामण खोसकर हे ८६ हजार ५८१ मतांनी निवडून आले. उदगिरमधून संजय बनसोडे यांना ९३ हजार २१४ मतांचे अधिक्य मिळाले. वाईतून मकरंद जाधव ६१,३९२ मतांनी जिंकले. याउलट शहापूरमधून दौलत दरोडा हे १६७२ मतांनी, पारनेरमधून काशिनाथ दाते १५२६ मतांनी जिंकले. मुंबईत अणुशक्तीनगरमधून या गटाच्या सना मलिक निवडून आल्या असल्या तरी त्यांचे पिता नवाब मलिक हे नजीकच्या मानखुर्द- शिवाजीनगरमधून पराभूत झाले. तसेच काँग्रेसमधून आयात केलेले झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व मधून पराभूत झाले. आंबेगावमध्ये दिलीप वळसे-पाटील हे १५२३ मतांच्या फरकाने जिंकू शकले. शिरूरमध्ये ज्ञानेश्वर कटके, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या वर्चस्वाला शह देत दत्ता भरणे विजयी झाले. भोरमध्ये शंकर मांडेकर, मावळमध्ये सुनील शेळके, पिंपरीत अण्णा बनसोडे, हडपसरमध्ये चेतन तुपे विजयी झाल्याने अजित पवार यांची पुणे जिल्ह्यावरील मांड पक्की झाली आहे. फलटण- सचिन पाटील, वाई- मकरंद जाधव, कागल- हसन मुश्रिफ हा भाग अजित पवार यांनी जिंकला आहे. हा शरद पवार यांना मोठा धक्का आहे.

नगर जिल्ह्यातही अकोले- किरण लहामटे, कोपरगाव- आशुतोष काळे, पारनेर- काशीनाथ दाते, नगर- संग्राम जगताप यांच्या विजयामुळे अजितदादा चांगलेचे फाॅर्मात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in