सुशीलकुमार शिंदेंना भाजपची ऑफर! खुद्द शिंदेंचा गौप्यस्फोट, पण काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात!

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मला आणि माझी कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर आली असल्याचा बुधवारी गौप्यस्फोट केला.
सुशीलकुमार शिंदेंना भाजपची ऑफर! खुद्द शिंदेंचा गौप्यस्फोट, पण काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात!

राजा माने/मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, फोडाफोडीच्या राजकारणाला आता उत आला आहे. काँग्रेसचे माजी खासदार तथा माजी मंत्री मिलिंद देवरा शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे खळबळ उडालेली असतानाच माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मला आणि माझी कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर आली असल्याचा बुधवारी गौप्यस्फोट केला. मात्र, आमच्या रक्तातच काँग्रेस असल्याने आम्ही कधीही काँग्रेस पक्ष सोडणार नाही, असेही स्पष्ट केले. शिंदे यांच्या गौप्यस्फोटामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. परंतु भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे यांना भाजपने कुठलीही ऑफर दिली नसल्याचे सांगितले, तर गिरीश महाजन यांनी शिंदे यांचे पक्षात स्वागत करू, असे म्हटले. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेण्यासाठी येत आहेत. या भेटीमागे तोच हेतू लक्षात घेऊन ते भेटायला येण्याअगोदरच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गौप्यस्फोट केला. त्यामुळे भाजपने डाव रचण्यापूर्वीच त्याचा फुगा फुटल्याचे बोलले जात आहे. यावरून कॉंग्रेस नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर भाजपमधील ६० ते ७० टक्के लोक कॉंग्रेसमधील आहेत. यावरून भाजप सत्तेसाठी किती हापापलेली आहे, याचा अंदाज येतो, असे टीकास्त्र पटोले यांनी सोडले.

अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे हुरडा पार्टीचे आयोजन केले होते. या हुरडा पार्टीनंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत माझा दोनवेळा पराभव झाला. परंतु तरीही आता मला आणि प्रणितीताई यांना भाजप पक्षात येण्याची ऑफर देत आहे, असे म्हटले. त्यामुळे राजकीय गोटात एकच खळबळ उडाली. परंतु त्यानंतर त्यांनी खुलासा करताना त्यांनी काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष कदापिही सोडणार नाही. राजकारणात हार-जित होतच असते. पण याची काळजी करायची नसते. आज वाईट दिवस आहेत. परंतु हेही दिवस निघून जातील, असा विश्वासही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

बावनकुळेंनी केला इन्कार

या ऑफरबद्दल बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही सुशीलकुमार शिंदे यांना कुठलीही ऑफर दिली नसल्याचे सांगितले, तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी सर्व देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. अनेकांना आता भाजपशिवाय पर्याय नाही, असेच वाटत आहे. सुशीलकुमार शिंदे मोठे नेते आहेत. तसेच ते माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. अनेकांना काँग्रेस पक्षात भवितव्य नाही, असे वाटत आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील, तर त्यांचे स्वागत करू, असे म्हटले.

नाना पटोलेंचा टोला

भाजपकडे स्वत:चे लोकच नाहीत. जवळपास ६० ते ७० टक्के लोक काँग्रेस पक्षातून गेली आहेत. सत्तेसाठी त्यांचे हे कारस्थान सुरू आहे. यावरून ते सत्तेसाठी किती हापापले आहेत, याचा अंदाज येतो. ऑफर देणा‌ऱ्यांना सुशीलकुमार शिंदे यांनी योग्य उत्तर दिले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in