नागपुरात स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट; ५ महिलांसह ६ ठार, ३ जखमी

नागपूर शहराजवळ असलेल्या एका स्फोटकांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटात पाच महिलांसह सहा कामगार ठार झाले, तर तीन जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागपुरात स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट; ५ महिलांसह ६ ठार, ३ जखमी
PTI
Published on

नागपूर : नागपूर शहराजवळ असलेल्या एका स्फोटकांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटात पाच महिलांसह सहा कामगार ठार झाले, तर तीन जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कारखान्यात दुपारी १ वाजण्याच्या सुमाराला हा स्फोट झाला.

या स्फोटात एकूण नऊ जण जखमी झाले होते. या जखमींना नागपूरमधील दोन खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असता या नऊ जणांपैकी पाच महिला आणि एक पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितले. दुपारी कारखान्यातील पॅकेजिंग विभागात काम सुरू असताना हा स्फोट झाला.

मृतांची ओळख पटली असून प्रांजली मोदरे, प्राची फालके, वैशाली क्षीसागर, मोनाली अलोणे, पन्नालाल बंदेवार यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर रुग्णालयात उपचारादरम्यान शीतल चटप या महिला कामगाराचा मृत्यू झाला. नागपूरजवळील धामना येथे स्फोटके तयार करणाऱ्या चामुंडा कंपनीत दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक स्फोटाचा मोठा आवाज झाला. यावेळी कंपनीत १० ते १२ कामगार कामावर होते, त्यापैकी ५ कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एका महिला कामगाराचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य तीन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दगावलेले कामगार वाडी आणि धामना परिसरात राहत असल्याचे समजते. या घटनेनंतर लगेचच परिसरातील नागरिकांनी जखमी कामगारांना तात्काळ रविनंगरातील सेनगुप्ता रुग्णालयात हलविले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गडकरींना व्यक्त केला शोक

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. नितीन गडकरी हे पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री झाल्याबद्दल गुरुवारी सायंकाळी त्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता, मात्र गडकरी यांनी हा समारंभ रद्द करण्याच्या सूचना स्थानिक कार्यकर्त्यांना दिल्या.राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनास्थळाला भेट दिली. ‘या कारखान्याचे मालक आणि व्यवस्थापक फरार झाले असून स्फोटानंतर तेथे मदतकार्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती. आपल्या कार्यकर्त्यांनी तेथे रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या’, असा दावा देशमुख यांनी यावेळी केला.

कंपनीचे मालक व व्यवस्थापक फरार

घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी तत्काळ बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. हा स्फोट इतका भीषण होता की कारखान्याची भिंतही तुटली आणि छतही उडून गेले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ माजला. घटनेची माहिती मिळताच मृत व जखमींचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर कंपनीचे व्यवस्थापक आणि मालक फरार झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in